रेडिओ क्लब जेट्टीसाठी नव्याने निविदा; उर्वरित बांधकाम २४ महिन्यांत पूर्ण करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 11:01 IST2026-05-02T11:00:55+5:302026-05-02T11:01:19+5:30
जुन्या कंत्राटदाराची बँक गॅरंटी दंडाच्या स्वरूपात जप्त

रेडिओ क्लब जेट्टीसाठी नव्याने निविदा; उर्वरित बांधकाम २४ महिन्यांत पूर्ण करणार
मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाकडून (एमएमबी) रेडिओ क्लबजवळ नवीन जेट्टीच्या बांधकामासाठी नव्याने निविदा काढण्यात आली आहे. आरकेईसी प्रोजेक्ट लिमिटेड या कंत्राटदाराने वेळेचे पालन न केल्यामुळे १९९ कोटी रुपयांचे कंत्राट रद्द केले आहे. तसेच, त्याची बँक गॅरंटी दंडाच्या स्वरूपात जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेटवे ऑफ इंडिया येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधा प्रवाशांसाठी अपुरी पडत आहे. काही वेळेस प्रवाशांना विशेषतः वृद्ध व्यक्ती, स्त्रिया आणि लहान मुले यांना चढ-उतरणीमध्ये अडचणी निर्माण होतात. यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून रेडिओ क्लब येथे नवीन जेट्टी उभारण्यात येत आहे. कंत्राटदाराकडून जेट्टीचे बांधकाम ३० महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित होते. त्यानुसार फेब्रुवारीपर्यंत ५० टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित असताना १० टक्क्यांपेक्षा कमी काम झाल्याने त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले. आता उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा काढण्यात आली आहे.
कामाची सद्य:स्थिती अशी...
सध्या पाइलिंगचे (खांब) काम सुरू असून, ३० पेक्षा जास्त खांब पूर्ण झाले आहेत. प्रीकास्ट बीम, प्रीकास्ट स्लॅब व प्रीकास्ट पाइलमफ तयार करण्याचे काम सुरू असून, या घटकांच्या निर्मितीसाठी शिवडी येथे कास्टिंग यार्ड कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन जेट्टीवर एकावेळेस २० बोटी उभ्या करण्याची व्यवस्था असेल. तसेच ११ हजार १५१ चौरस मीटर इतका बर्थिंग एरिया असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासी आणि पर्यटन जलवाहतुकीसाठी आधुनिक जेट्टी व पूरक सुविधा उपलब्ध होणार असून, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील विद्यमान जेट्टींवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
नव्या कंत्राटामधून ३५० लोकांची क्षमता असलेले ॲम्फीथिएटर आता प्रकल्पांमधून वगळण्यात आले आहे.
नवीन कंत्राट १९६.३५ कोटींचे
सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन कंत्राट हे १९६.३५ कोटी रुपयांचे असून, ते आधीच्या कंत्राटापेक्षा ३.५ कोटी कमी दराचे आहे. तसेच बांधकाम कालावधीदेखील सहा महिन्यांनी कमी केला आहे. हे काम कंत्राटदाराच्या नियुक्तीपासून २४ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित राहणार आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत नवीन कंत्राटदारांची नियुक्ती होणे अपेक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
जेट्टीची वैशिष्ट्ये अशी...
टर्मिनल प्लॅटफॉर्म रुंदी - ८० × ८०
जेट्टी - २१४ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद
बर्थिंग जेट्टी (१० प्लॅटफॉर्म्स) - ३८.७ मी. × ७.५ मी.
सुरक्षा तपासणी क्षेत्र, वेटिंग एरिया, टॉयलेट, पाणपोई
अग्नी सुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे
संरक्षण भिंतीपासून जेट्टीची पूर्ण लांबी ६५० मी. इतकी आहे.