श्वानांच्या नसबंदीवर पालिका खर्च करणार २३ कोटी रुपये, पुढील तीन वर्षांत १.३५ लाख श्वानांच्या निर्बीजीकरणाचे उद्दिष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:25 IST2026-04-14T13:24:49+5:302026-04-14T13:25:20+5:30
Mumbai News: मुंबईत २०१७ ते ऑगस्ट २०२५ या आठ वर्षांत सुमारे दीड लाखाहून अधिक भटक्या श्वानांची नसबंदी महापालिकेने केली आहे. येत्या वर्षभरात ४५ हजार, तर पुढील तीन वर्षांमध्ये एक लाख ३५ हजार श्वानांची नसबंदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

श्वानांच्या नसबंदीवर पालिका खर्च करणार २३ कोटी रुपये, पुढील तीन वर्षांत १.३५ लाख श्वानांच्या निर्बीजीकरणाचे उद्दिष्ट
मुंबई - मुंबईत २०१७ ते ऑगस्ट २०२५ या आठ वर्षांत सुमारे दीड लाखाहून अधिक भटक्या श्वानांची नसबंदी महापालिकेने केली आहे. येत्या वर्षभरात ४५ हजार, तर पुढील तीन वर्षांमध्ये एक लाख ३५ हजार श्वानांची नसबंदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयासह नऊ संस्थांची नियुक्ती करण्यात आली असून, नसबंदीसाठी पालिका सुमारे २३ कोटी रुपये खर्च करणार आहेत.
भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. अनेक भागांमध्ये रात्री नागरिकांच्या अंगावर येऊन श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनाही दररोज घडत आहेत. भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
दुसरीकडे त्यांना ठार करू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम पालिकेने गेली काही वर्षे हाती घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या १९९८ च्या आदेशानुसार श्वानांच्या नसबंदीचा कार्यक्रम अशासकीय संस्थांच्या सहभागाने सुरू असून, ऑगस्ट २०२५ पर्यंत एकूण चार लाख ३४ हजार ५२९ श्वानांची नसबंदी करण्यात आली आहे.
नऊ संस्थांवर सोपविली जबाबदारी
द वेल्फेअर ऑफ स्ट्रेडॉग्ज (महालक्ष्मी), दी बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल (परळ), इन डिफेन्स ऑफ एनिमल (देवनार), अहिंसा (मालाड), उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन (मुलुंड), मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (परळ), युथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल, वेटरनली थेरपेटिक्स एंडोसर्जरी ॲण्ड मेडिसिन सोसायटी (मुलुंड) आणि युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी (मालाड) या नऊ संस्थांवर महापालिकेने मुंबई शहर आणि उपनगरातील श्वानांच्या निर्बीजीकरणाची जबाबदारी सोपविली आहे.
...तर संख्या पोहोचेल साडेचार लाखांवर
जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या श्वान सर्वेक्षणानुसार, त्यावेळी अस्तित्वात असलेल्या ९० हजार ७५७ श्वानांपैकी ३३ हजार ६७१ भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण झाले नाही. यामध्ये २२ हजार ४४७ नर व ११ हजार २२४ मादी श्वानांचा समावेश आहे.
एका मादीला ४ पिल्ले झाल्यास २०२४ ते २०३३ या कालावधीत भटक्या श्वानांची संख्या सुमारे साडेचार लाख इतकी होईल. यापूर्वी २०१७ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील शस्त्रक्रिया झालेल्या श्वानांची संख्या एक लाख ५३ हजार ६२२ इतकी आहे.
२९ वर्षांत २४ टक्के श्वानांचा मृत्यू
निर्बीजीकरणानंतर प्रशासनाकडून श्वानाला जेथून पकडण्यात आले आहे, त्याच ठिकाणी सोडण्यात येते. मात्र, अनेकदा त्याला आरोग्याच्या समस्या असल्यास किंवा रेबीज असल्यास त्यांचा मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. मागील २९ वर्षांत झालेल्या निर्बीजीकरणात जवळपास २४ टक्के भटक्या श्वानांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, तर जगण्याचे प्रमाण ७६ टक्के आहे.