Rani Baug: "राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लांचं नाव बदलता येणार नाही", प्रशासनाकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:04 IST2025-06-04T16:00:28+5:302025-06-04T16:04:05+5:30

Rani Baug Penguin chicks Name: राणी बागेतील पेंग्विनच्या पिल्लांना देण्यात आलेल्या नावावरून नवा वाद सुरू झाला.

Mumbai Rani Baug Penguin chicks Name, Veermata Jijabai Bhosale Park and Zoo | Rani Baug: "राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लांचं नाव बदलता येणार नाही", प्रशासनाकडून स्पष्टीकरण

Rani Baug: "राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लांचं नाव बदलता येणार नाही", प्रशासनाकडून स्पष्टीकरण

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील हंबोल्ट पेंग्विनच्या जोड्यांनी आणखी तीन पिल्लांना जन्म दिला. त्यामुळे पेंग्विनची एकूण संख्या २१ झाली. या पिल्लांचे नामकरणही करण्यात आले. नॉडी, टॉम आणि एक मादी पिल्लाला 'पिंगु' अशी नावे देण्यात आली. मात्र, या नावावरून नवा वाद निर्माण झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राणीच्या बागेत मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला. याशिवाय, या पिल्लांना मराठी नावे द्या, अशीही त्यांनी मागणी केली. यावर प्रशासनाने स्पष्टीकरण देत हात झटकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, राणी बागेतील पेंग्विनसाठी मोल्ड, डोनॉल्ड, डेसी, पोपॉय, ऑलिव्ह, बबल, ओरिओ, बिंगो, निमो, जेरी, फ्लिपर, अॅलेक्सा, सिरी, डोरा, कोको आणि स्टेला अशी नावे देण्यात आली आहेत. यातील ऑलिव्ह आणि पोपॉय या जोडीने ४ मार्चला एका नर पिल्लाला जन्म दिला. त्याचे नाव नॉडी ठेवण्यात आले. डोनाल्ड आणि डेझी या जोडीने दिलेल्या अंड्यातून ७ मार्चला एक पिलू जन्मले असून त्याचे नाव टॉम ठेवण्यात आले. तर, ११ मार्चला जन्मलेल्या मादी पिल्लूचे नावा पिंगु ठेवण्यात आले. मात्र, यावरून नव्या वादाला सुरुवात झाली. या पेंग्विनना इंग्रजी नावे देण्यात आल्याबद्दल भाजपने आक्षेप नोंदवला आणि त्यांना मराठी नावे देण्याची मागणी केली.
 
राणी बागेतील पेंग्विनच्या पिल्लांची नावे प्रसिद्ध कार्टून पात्रांवरून देण्यात आली आहेत. प्रशासनाचा यामध्ये कोणताही राजकीय अथवा भाषिक हेतू नाही.लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या कार्टून विश्वातील नावे वापरल्यामुळे मुलांना पेंग्विन अधिक आवडतील आणि त्यांच्याशी जोडले जातील, हा त्यामागचा उद्देश आहे. या पिल्ल्यांची नावासहीत माहिती दिल्लीकडे दिली आहेत. त्यामुळे या नावांमध्ये आता कोणत्याही प्रकारचे बदल होऊ शकत नाही, असे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Mumbai Rani Baug Penguin chicks Name, Veermata Jijabai Bhosale Park and Zoo