मुंबईच्या जीवनवाहिनीचा 'ती'ला सुखद आधार; विशेष लोकलला ३४ वर्षे पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:49 IST2026-05-06T15:46:55+5:302026-05-06T15:49:31+5:30
१९९२ मध्ये धावली होती महिलांसाठी पहिली गाडी

मुंबईच्या जीवनवाहिनीचा 'ती'ला सुखद आधार; विशेष लोकलला ३४ वर्षे पूर्ण!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वेच्या इतिहासात महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर करणाऱ्या 'लेडीज स्पेशल' लोकलने मंगळवारी ३४ यशस्वी वर्षे पूर्ण केली आहेत. ५ मे १९९२ रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर देशातील पहिली महिला विशेष लोकल धावली होती. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी महिला तिकीट परीक्षकांनी महिला प्रवाशांना फुले देऊन या प्रवासाचा आनंद द्विगुणित केला.
सन १९९० च्या दशकात मुंबईच्या व दक्षिण भागात औद्योगिक व्यावसायिक वाढ मोठ्या प्रमाणात झाली. त्याचबरोबर उपनगरांमधून, विशेषतः उत्तर मुंबईतून कामासाठी येणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढली होती. सुरुवातीला ही सेवा चर्चगेट ते बोरिवलीदरम्यान चालवण्यात आली होती. या लोकलच्या वाढत्या प्रतिसादामुळे १९९३ मध्ये ही सेवा विरारपर्यंत विस्तारित करण्यात आली.
मैत्रीचे अनोखे व्यासपीठ
पश्चिम रेल्वेकडून दररोज १० 'लेडीज स्पेशल' गाड्या चालवल्या जातात. या सेवेमुळे प्रवास सुलभ झाला नाही, तर महिलांमध्ये आपुलकी आणि मैत्रीचे बंधही निर्माण झाले आहेत. रोजच्या प्रवासात एकमेकांशी संवाद साधत अनेक महिलांनी मैत्री जुळवली आली.
'लेडीज स्पेशल' आधार
महिलांसाठीही 'लेडीज स्पेशल' मोठा आधार ठरत आहे. अनेकदा वैद्यकीय किंवा इतर कारणांमुळे गर्दीच्या वेळेत प्रवास करणे आवश्यक असते. अशा वेळी इतर गाड्यांमध्ये चढणे-उतरणे अवघड ठरते, परंतु या विशेष गाड्यांमुळे त्यांचा प्रवास सुरक्षित होतो.