मुलुंड, देवनार डम्पिंग दिवाळीनंतर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2015 02:51 IST2015-09-02T02:51:47+5:302015-09-02T02:51:47+5:30

येत्या दोन महिन्यांनी मुलुंड व देवनार डम्पिंग ग्राउंडच्या भूखंडाचा भाडेकरार संपत असल्याने ते बंद करण्यात येणार आहे. यामुळे या डम्पिंग ग्राउंडच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे

Mulund, Deonar dumping closed after Diwali | मुलुंड, देवनार डम्पिंग दिवाळीनंतर बंद

मुलुंड, देवनार डम्पिंग दिवाळीनंतर बंद

मुंबई : येत्या दोन महिन्यांनी मुलुंड व देवनार डम्पिंग ग्राउंडच्या भूखंडाचा भाडेकरार संपत असल्याने ते बंद करण्यात येणार आहे. यामुळे या डम्पिंग ग्राउंडच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र महापालिकेची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण हे दोन्ही डम्पिंग ग्राउंड बंद होत असल्याने कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडची क्षमता पालिकेला वाढवायची आहे. यासाठी पालिकेने राज्य शासनाकडे प्रस्तावही पाठवला आहे. यामध्ये कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर खाजगी कंत्राट देण्याचा पालिकेचा विचार आहे. ही पद्धत अवलंबताना शासनाची परवानगी बंधनकारक आहे.
शासनाने पालिकेच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय दिलेला नाही. अखेर मंगळवारी पालिकेने ही बाब न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. त्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मलनि:सारण नियमांचे पालन डम्पिंग ग्राउंडवर होत नाही. शासनाने आठवड्याभरात यावर निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणी काही सामाजिक संघटनांनी स्वतंत्र जनहित याचिका केल्या आहेत. त्यावरील गेल्या सुनावणीत न्यायालयाने डम्पिंगचे नियोजन न झाल्यास मुंबईत नवीन इमारतींना परवानगी देणार नाही, असे बजावले होते. मंगळवारी पुन्हा न्यायालयाने शासनावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता तरी शासन यावर निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mulund, Deonar dumping closed after Diwali