'मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आंदोलनात राजकारण येऊ नये'

By महेश गलांडे | Published: January 25, 2021 12:20 PM2021-01-25T12:20:15+5:302021-01-25T12:23:15+5:30

मुंबईतील आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे

'Modi took decisions in the interest of farmers, politics should not come in agitation', pankaja munde | 'मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आंदोलनात राजकारण येऊ नये'

'मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आंदोलनात राजकारण येऊ नये'

Next
ठळक मुद्देमुंबईतील आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे

औरंगाबाद/मुंबई - दिल्लीत गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू असून मुंबईतही हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनासंदर्भात भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडेंना विचारलं असता, सकारात्मक चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच, मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

मुंबईतील आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होत आहेत. हजारो शेतकऱ्यांसह राज्यातील दिग्गज नेतेही आंदोलनात सहभागी होत आहेत. मात्र, भाजपाकडून या नेत्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांचा सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असल्याचं म्हटलंय. आता, पंकजा मुंडेंनीही सावध पवित्रा घेत सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले.   

शेतकरी आंदोलनाबाबत पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं असता, केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले आहेत आणि आताही सरकार शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. हा बळीराजाचा देश आहे, मोदींनी पीक विम्याचा, हमीभाव, शेतकऱ्यांना पेन्शन द्यायचा असे महत्त्वाचे निर्णय घेतले. सरकार सकारात्मक चर्चेसाठी तयार आहे. दोन्ही बाजूंनी सकारात्म चर्चा झाल्यास नक्कीच तोडगा निघेल. महाराष्ट्रात आंदोलन पोहोचायला तीन महिने का लागले, हा साधा प्रश्न आहे. शेतकरी बाजूला न राहता या आंदोलनात राजकारण येऊ नये, हा प्रयत्न सर्वांचाच असला पाहिजे, असेही पंकजा यांनी म्हटले. 

धनंजय मुंडेच्या आरोपाबद्दल पंकजा म्हणतात

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "तो विषय आता मागे पडला आहे. तरीही त्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आता आलाच आहात तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं मी कधीही समर्थन करू शकत नाही", असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्या औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. "कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा त्या कुटुंबातील ज्यांचा काही दोष नाही अशा लहान मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. सहाजिक एक नातं म्हणून आणि महिला म्हणून मी याकडे संवेदनशीलपणे बघते. हा विषय कोणाचाही असता तरी मी त्याचं राजकीय भांडवल केलं नसतं आणि आताही करणार नाही. यात संवेदनशीलपणे विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच", असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. 

ओबीसीचा मुख्यमंत्री?

जालना येथे रविवारी ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा पार पडला होता. यात पुढचा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचाच होणार असा बॅनर दिसला होता. याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सावध पवित्रा घेतला.  "मला याच्यापासून थोडं मुक्त ठेवा. आता ही चळवळ मला कुठल्याही पदावर नसताना लढायची आहे आणि ते माझ्यासाठी जीवनातील एक महत्वाचं ध्येय आहे. मुंडे साहेबांची ती एक अधुरी लढाई आहे ती पूर्ण करायची आहे", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
 

Web Title: 'Modi took decisions in the interest of farmers, politics should not come in agitation', pankaja munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.