काळोखेची सुपारी अनेकांनी धुडकावली

By Admin | Updated: June 2, 2015 04:46 IST2015-06-02T04:46:55+5:302015-06-02T04:46:55+5:30

प्रियकर, साथीदार धर्मराज काळोखेची सुपारी ड्रगमाफिया शशिकला ऊर्फ बेबी पाटणकरने मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांकडे फिरवण्याचा प्रयत्न केला होता

Many of the blackmakers of Kalokhe are rejected | काळोखेची सुपारी अनेकांनी धुडकावली

काळोखेची सुपारी अनेकांनी धुडकावली

जयेश शिरसाट, मुंबई
प्रियकर, साथीदार धर्मराज काळोखेची सुपारी ड्रगमाफिया शशिकला ऊर्फ बेबी पाटणकरने मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांकडे फिरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी तिने अधिकाऱ्यांना लाखो रुपयांचे आमिषही दाखवले होते. मात्र बेबीची पार्श्वभूमी माहीत असल्याने प्रत्येकाने तिचे काम करण्यास नकार दिला, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या अधिकाऱ्यांचेही जबाब गुन्हे शाखेकडून नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
काळोखेसोबत बेबीचे अवैध संबंध होतेच, मात्र तो तिच्या धंद्यातही (अमली पदार्थ) भागीदार होता. बेबीचे एमडी इथून तिथे सुरक्षितपणे पोहोचविणे, तिला कायदेशीर सल्ला पुरविणे, वेळप्रसंगी मध्यस्थी करून पोलिसांच्या कचाट्यातून सोडविणे ही काळोखेची मुख्य जबाबदारी होती. अनेक वर्षे सोबत काम केल्यानंतर या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत दोघांचे संबंध बिघडले. त्यानंतर बेबी काळोखेला पाण्यात पाहू लागली. त्याला अद्दल घडवण्यासाठी तिने भन्नाट कट आखला. काळोखेच्या गावच्या घरी १०० किलो एमडी साठा होता. या साठ्यासह त्याला पकडून द्यावे, असे तिने ठरवले होते.
काम पोलिसांशिवाय कोणीही करू शकणार नाही याची पूर्ण कल्पना तिला होती. त्यामुळे तिने अटक आरोपी निलंबित पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड, शिपाई यशवंत पार्टे यांना हाताला धरले. हे दोघे बेबीचा प्रस्ताव घेऊन मुंबई पोलीस दल व गुन्हे शाखेतील काही अधिकाऱ्यांकडे धडकले. यापैकी काही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन काळोखेला पकडण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही तर काही अधिकाऱ्यांनी बेबीचा प्रस्ताव घेऊन आलेल्या गायकवाड, पार्टे यांना हाकलून लावले, अशी माहिती पुढे आली आहे.
वादग्रस्त उपअधीक्षक अशोक ढवळे हेही बेबीच्या संपर्कात होते. फेब्रुवारी २०११ मध्ये गुन्हे शाखेला ढवळे शासकीय वाहनातून दीड किलो हेरॉइनची तस्करी करणार, अशी माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेने सापळा रचून त्यांना हेरॉइनसह अटक केली. पुढे ही माहिती बेबीनेच गुन्हे शाखेच्या त्या पथकापर्यंत पोहोचविल्याचे स्पष्ट झाले. बेबीने ढवळेंना अडकविण्यासाठी गुन्हे शाखेचा वापर केला होता.

Web Title: Many of the blackmakers of Kalokhe are rejected