Maharashtra Election 2019: शेवटच्या प्रचारात गल्लीबोळ पिंजून काढण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 02:06 AM2019-10-20T02:06:38+5:302019-10-20T06:47:56+5:30

Maharashtra Election 2019: बाइक रॅली, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठी

Maharashtra Election 2019: all partys rally for election | Maharashtra Election 2019: शेवटच्या प्रचारात गल्लीबोळ पिंजून काढण्यावर भर

Maharashtra Election 2019: शेवटच्या प्रचारात गल्लीबोळ पिंजून काढण्यावर भर

Next

दहिसर - बोरीवली - दहिसरच्या विद्यमान आमदार आणि महायुतीच्या उमेदवार असलेल्या मनीषा चौधरी यांच्या मतदारसंघात शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री संदीप सिंग यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मनीषा चौधरी यांच्या विरोधात मनसेचे राजेश येरुणकर आणि काँग्रेसचे अरुण सावंत उभे असून, शेवटच्या दिवशी त्यांनीही महारॅली काढल्या. विनोद तावडे यांच्याऐवजी उमेदवारी मिळालेल्या सुनील राणे यांनी पदयात्रेने प्रचार पूर्ण केला.

कांदिवली पूर्व - भाजपचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी सकाळी हनुमाननगरमध्ये बाइक रॅली काढली. अखेरच्या दिवशी संपूर्ण मतदारसंघात भातखळकर यांनी या बाइकस्वारांबरोबर धावती भेट देत पुन्हा एकदा महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले. मनसेचे उमेदवार हेमंत कांबळे यांनीही बाइक रॅली काढली़ काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अजंता यादव यांनी मतदारांची भेट घेत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

मालाड - भाजपचे उमेदवार रमेशसिंह ठाकूर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार केला़ काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी रॅली काढली़ तसेच अभिनेता आदित्य पंचोलीला बोलावत प्रचार केला.

गोरेगाव - भाजप उमेदवार विद्या ठाकूर यांनी पदयात्रेचे आयोजन केले होते. काँग्रेसचे युवराज मोहिते यांनीही महारॅली तर मनसेचे वीरेंद्र जाधव यांनी बाइक रॅली काढत प्रचार संपविला.

जोगेश्वरी पूर्व - विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांनी शनिवारी प्रचार करण्यापेक्षा विभागातील विविध जनसमुदायांतील नागरिकांसोबत चर्चा करण्यावर जास्त भर दिला, तर काँग्रेसचे उमेदवार सुनील कुमरे यांनी शनिवारी बाइक रॅलीचे आयोजन केले होते. आम आदमी पार्टीचे विठ्ठल लाड, बहुजन समाज पार्टीचे कुंदन वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे दिलबाग सिंग, अपक्ष अनिल चव्हाण आणि मिलिंद भोळे यांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

दिंडोशी - शिवसेनेचे उमेदवार सुनील प्रभू यांनी बाइक रॅली रद्द केली. त्यांनी पदयात्रा काढली, तर मनसेचे उमेदवार अरुण सुर्वे यांनीही पदयात्रा काढत थेट मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीच्या उमेदवार विद्या चव्हाण यांनी पाऊस असतानाही बाइक रॅली काढत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

चांदिवली - काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी शेवटच्या दिवशीही प्रचाराचा धडाका लावला. रोड शोपासून मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला. शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी शेवटच्या दिवशी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

वर्सोवा, अंधेरी पश्चिम व अंधेरी पूर्व - वर्सोव्यात महायुतीच्या उमेदवार भारती लव्हेकर यांनी बाइक रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. रॅलीत आयोजकांनी हेल्मेट सक्तीचे केले होते. दुपारी नागरिकांबरोबर बैठका घेतल्या. शिवसेना बंडखोर राजुल पटेल यांच्या प्रचारात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक पुरुष व महिला उतरल्या. काँग्रेसचे उमेदवार बलदेव खोसा यांनी बैठकांवर जोर दिला. मनसेचे संदेश देसाई यांनी प्रचार फेरी काढली. अंधेरी पश्चिममध्ये महायुतीचे उमेदवार अमित साटम यांनी सकाळी ९ वाजल्यापासून प्रचाराला सुरुवात केली. मनसेचे किशोर राणे यांनी प्रचार फेरी काढली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रमेश लटके यांनी बाइक रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. भाजप बंडखोर मुरजी पटेल यांनी शक्तिप्रदर्शन करत प्रचार फेरी काढली. काँग्रेसचे उमेदवार जगदीश अमिन कुट्टी यांनी प्रचार फेरी काढली.

विलेपार्ले - मनसेच्या जुईली शेंडे आणि काँग्रेसचे जयंती सिरोया यांनी मतदारांच्या भेटीगाठंवर अधिक भर दिला़ भरपावसात बाईक रॅली व पदयात्रा काढण्यात आल्या़ तसेच विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना मतदारांनी शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाच्या गाठीभेटी घेता आल्या. कार्यकर्त्यांनी भरघोस पाठिंबा दिला. त्यांच्या जोरावर आम्ही येथे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विलेपार्ले येथे येऊन गेले; त्याचाही फायदा आम्हाला झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रचारामुळे निश्चितच आम्ही सकारात्मक आहेत. या सर्वांचा आम्हास नक्कीच फायदा होईल, असे भाजपचे उमेदवार पराग अळवणी यांनी सांगितले.

कलिना - शिवसेनेचे उमेदवार संजय पोतनीस यांनी प्रचार रॅली काढली. तर काँग्रेसचे उमेदवार जॉर्ज अब्राहम यांनी रोड शो केला. मनसेचे उमेदवार संजय तुर्डे यांनीही रॅली काढली. पावसामुळे प्रचारावर विरजण पडले़
वांद्रे पश्चिम - विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अ‍ॅड़ आशिष शेलार यांनी बाइक रॅली काढून प्रचाराची सांगता केली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इश्तिहाक जहागीरदार यांनी कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढण्यावर व घरोघरी फिरून प्रचार करण्यावर भर दिला. काँग्रेस उमेदवार आसिफ झकेरिया यांनी खार परिसरात पदयात्रा काढली़

माहिम - माहिम विधानसभा निवडणुकीत यंदा शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यात सामना रंगणार आहे. शिवसेना-भाजप युतीने पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी बाइक रॅली काढून प्रत्युत्तर दिले.

मुलुंड - मुलुंडमध्ये अमरनगर येथून काँग्रेस उमेदवार गोविंद सिंह यांच्या बाइक रॅलीला सुरुवात झाली. मात्र पावसामुळे रॅलीला मध्येच ब्रेक लागला आणि वाहने पुन्हा कार्यालयाकडे धडकली. भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांची खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाजवळून पदयात्रेला सुरुवात झाली. वंचितचे उमेदवार शशिकांत मोकल यांनी परिसर पिंजून काढला.

भांडुप - शिवसेनेचे उमेदवार रमेश कोरगावकर यांची पावसातही बाइक रॅली सुरू होती. तर, काँग्रेस उमेदवार सुरेश कोपरकर, वंचितचे उमेदवार सतीश माने यांच्यासह मनसे उमेदवार संदीप जळगावकर यांनीही बाइक रॅलीसह पदयात्रेद्वारे भांडुपकरांच्या भेटीगाठी घेतल्या.

विक्रोळी - सजवलेल्या रथावर सेनेचे उमेदवार सुनील राऊत स्वार होत पाठीमागे कार्यकर्त्यांना घेत विक्रोळीत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मनसे उमेदवार विनोद शिंदे यांनी पवई आणि सूर्यानगर परिसरात पदयात्रा काढत मतदारांशी गाठीभेटी घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय पिसाळ आणि वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांनीही बाइक काढली.

घाटकोपर पश्चिम - भाजपचे राम कदम, मनसेचे गणेश चुक्कल आणि काँग्रेसचे आनंद शुक्ला यांच्यात जोरदार चुरस असून, या तिन्ही उमेदवारांनी अखेरच्या दिवशी प्रचारात आघाडी घेतली होती. विशेषत: प्रत्येकाला भेटणे शक्य नसले, तरीदेखील उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर अधिकाधिक भर दिला होता.

अणुशक्तीनगर - महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार तुकाराम काते यांच्या पदयात्रेला चेंबूर चौकातील प्रचार कार्यालयापासून प्रारंभ झाला. काँग्रेस आघाडीचे उमेदवार व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी बाइक रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. वंचित बहुजन आघाडीचे यासीन तांबोळी यांनी आपल्या समर्थकांसमवेत रॅली काढून मतदारांना भावनिक आवाहन केले. मनसेचे उमेदवार विजय रावराणे यांनी निवडणुकीचे चिन्ह असलेल्या रेल्वे इंजीनसदृश सजावट केलेल्या वाहनातून मिरवणूक काढली.

चेंबूर - शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रकाश फातर्फेकर यांनी दुपारी पांजरपोळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत लोकांशी नाळ जुळली आहे. त्यामुळे नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, मतदानाच्या रूपाने ते आशीर्वाद देतील, अशी अपेक्षा फातर्फेकर यांनी व्यक्त केली़ तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांनीही दुचाकीची रॅली काढली. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राजेंद्र माहुलकर यांनी दुचाकी रॅली काढली.

कुर्ला - शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांनी चुनाभट्टी स्थानक फाटकापासून सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद कांबळे यांनी टिळकनगरपासून सुरुवात करत प्रचार रॅली काढली.

सायन - भोजपुरी सुपरस्टार्स, उत्तर प्रदेश व तामिळनाडूतील मोठ्या नेत्यांच्या हजेरीमुळे चर्चेत राहिलेल्या सायन कोळीवाड्यातील प्रचाराची सांगता भाजपच्या महारॅलीने झाली. काँग्रेस उमेदवाराने मात्र सायन कोळीवाड्यातील नागरी समस्या, मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

धारावी - शिवसेनेचे उमेदवार आशिष मोरे यांच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे रोड शोमध्ये सहभागी झाले होते़ अभिनेता सलमान खान यांचे अंगरक्षक असलेले शेरा व शिवसेनेचे प्रचार समन्वयक साईनाथ दुर्गे, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. एमआयएमचे उमेदवार मनोज संसारे यांनी पदयात्रा काढून शेवटच्या दिवशी प्रचार केला. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी पदयात्रा व घरोघरी भेट देण्यावर भर दिला.

Web Title: Maharashtra Election 2019: all partys rally for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.