"अधिवेशनात कधीही बाजूला नजर गेली की, अजितदादा असायचे..."; विधानसभेत शोक प्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:10 IST2026-02-23T13:58:13+5:302026-02-23T14:10:04+5:30
Maharashtra Budget Session 2026 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरुवात झाली. अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला.

"अधिवेशनात कधीही बाजूला नजर गेली की, अजितदादा असायचे..."; विधानसभेत शोक प्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस भावुक
Maharashtra Budget Session 2026 : राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. यावेळी दादांच्या आठवणी सांगताना मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
Top Marathi News Live: मुंबई- पुणे महामार्गावर टँकरचा अपघात
"महाकवी भास यांच्या 'स्वप्नवासवदत्तम्' या नाटकात एक सुभाषित आहे. 'लाकूड जळते तेव्हा अग्नी केवळ शरीर जाळतो, परंतु मित्रशोक हा हृदय आणि अंतरात्म्यालाही जाळून खातो', असे त्यात म्हटले आहे. अजित पवार यांच्या निधनाने हीच वेळ आज माझ्यावर आली आहे. त्यांच्यासारखा एक सच्चा मित्र आणि राजकीय सहप्रवाशाचे जाणे, ही केवळ राजकीय हानी नाही, तर ती आपल्या सर्वांच्या अंतःकरणाला वेदना देणारी घटना आहे. 'काळ हे सर्व दुःखांवरचे औषध आहे' असे म्हणतात, मात्र या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी आणि मनातील वेदना कधीही कमी होणाऱ्या नाहीत," अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"बाजूला नजर गेली की, बाजूला खुर्चीत दादा असायचे...."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज बोलणं कुठून सुरू करावं असा मला प्रश्न पडला आहे. प्रचंड वादळ मनात आहे. कारण आज सभागृहात शोक प्रस्तावासाठी आपण एकत्र आहोत. कधीच कल्पना केली नव्हती अशाप्रकारच्या शोकप्रस्तावावर व्यक्त व्हावं लागेल. अधिवेशनात कधीही सहज बाजूला नजर गेली की, बाजूला खुर्चीत दादा असायचे. सकाळपासून रात्री कितीही उशीरापर्यंत सभागृह चाललं तरी अजितदादा आपल्या जागेवर बसलेले दिसायचे.
अजित पवार कठोर निर्णय घ्यायला मागेपुढे पाहत नव्हते. पण त्याचवेळी वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेचा भार अर्थसंकल्पावर फार मोठ्याप्रमाणात पडेल याचा पुनर्विचार करा, असे सुचवल्यावर ठामपणे निर्णय घेऊन तो विषय मंत्रिमंडळापुढे आणण्याचा काम करणारे अजितदादा होते. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर त्यांनी गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली. त्यांनी ते जॅकेट आम्हालाही घालायला लावले होते, ही आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
"यावर्षी अजितदादांनी बारावा अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी १३ वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाची बरोबरी केली असती. कदाचित पुढच्या काळात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून त्यांचे कार्य राहिले असते. पण अचानकपणे दादा आपल्यातून निघून गेले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्याच जबाबदारी माझ्यावर आली, असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी बोलताना फडणवीस भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.