मेरी आवाज सुनो... लॅरिंगोस्कोप आला अन् सगळेच बदलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:09 IST2026-04-16T13:08:48+5:302026-04-16T13:09:11+5:30
मनुष्याचा आवाज ही खरंतर दैवी देणगी, जी अतिशय गृहीत धरली जाते. जगाशी संवाद साधण्याचे आवाज हे प्रभावी माध्यम असून आपले शरीरही याद्वारेच आपल्याशी संवाद साधते. शरीरात होणारे सगळेच बदल आवाजात उमटतात.

मेरी आवाज सुनो... लॅरिंगोस्कोप आला अन् सगळेच बदलले!
- सोनाली लोहार
व्हॉइस थेरेपिस्ट)
मनुष्याचा आवाज ही खरंतर दैवी देणगी, जी अतिशय गृहीत धरली जाते. जगाशी संवाद साधण्याचे आवाज हे प्रभावी माध्यम असून आपले शरीरही याद्वारेच आपल्याशी संवाद साधते. शरीरात होणारे सगळेच बदल आवाजात उमटतात. शारीरिक स्वास्थ्यासोबतच आवाज हा मानसिक स्वास्थ्याचाही आरसा आहे. इ. पू. ५ व्या शतकात प्राचीन ग्रीसच्या हिप्पोक्रेटीस या तज्ज्ञाने आवाज निर्मिती, आरोग्य, श्वसन व आवाज या विषयांवर काम केल्याच्या नोंदी आहेत.
‘व्हॉइस थेरपी’वर विविध ठिकाणी संशोधन
जिवंत व्यक्तीचं स्वरयंत्र कसे काम करते, हे तज्ज्ञांना बघता येण्यासाठी एकोणिसावं शतक यावं लागलं.
१८५४ साली ‘मॅन्युअल गार्शिया’ या स्पॅनिश स्वरतज्ज्ञांनी ‘घसा तपासण्याचा आरसा’ म्हणजेच ‘लॅरिंगोस्कोपचा’ शोध लावला आणि खऱ्या अर्थाने क्लिनिकल उपचार पद्धतीची सुरुवात झाली.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला औषधोपचार आणि शस्त्रक्रियांसोबतच ‘स्पीच थेरपी’चे विशेष अंग असलेली ‘व्हॉइस थेरपी’ उपचार पद्धत म्हणून स्वीकारली गेली. रुग्णालयांसह विद्यापीठांमध्ये प्रशिक्षण व संशोधनही सुरू झाले.
...तर तज्ज्ञांचा घ्या सल्ला
आवाज बसणे, खरखरीत होणे, आवाज चिरकणे, गळ्यात दुखणे, आवाजाची पट्टी बदलणे, मुलाचा आवाज मुलीसारखा किंवा मुलीचा आवाज मुलासारखा असणे यापैकी कुठलेही लक्षण दहा ते पंधरा दिवसांच्यावर राहिले तर ‘कान, नाक, घसा तज्ज्ञ’ आणि ‘व्हॉइस क्लिनिशअन्स/थेरपीस्ट’ यांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
योग्य तंत्र शिकवण्यावर भर
श्वसन, कंपन आणि अनुनाद या तीनही उपसंस्थांपासून तंतुवाद्यासारखी आवाज निर्मिती संस्था बनते. आवाज हा मनुष्याच्या वर्तनाचा भाग असून त्यावरील उपचार पद्धती ही ‘बिहेवियर थेरपीच’ असते. आवाजाच्या तक्रारींचे मूळ हे ‘आवाज निर्मितीची संस्था चुकीच्या पद्धतीने वापरणे’ हे असते. म्हणून ‘वोकल बिहेवियर’ मध्ये सुधारणा घडवून आवाजनिर्मितीचे योग्य तंत्र शिकवण्यावर भर असतो.
आवाजावर प्रेम करूया !
मनुष्य म्हणजे यंत्र नव्हे आणि त्याचा आवाज ही यांत्रिक क्रिया नव्हे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकलित माहितीवर आधारित असते, ज्याची एका तज्ज्ञाचे प्रशिक्षण, अनुभव आणि वैद्यकीय विचारशक्तीशी तुलना होऊ शकत नाही. तात्पर्य तंत्रज्ञान हे आवाज वाचू शकते पण त्या आवाजामागची खरी कहाणी समजून घेण्यासाठी मानवी संवेदनाच आवश्यक असतात. या देणगीचा आदर करूया, आपल्या आवाजावर प्रेम करूया !