आक्सा बीच वर जीवरक्षकांची तत्परता, चार मुलांचे प्राण वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 21:08 IST2026-05-02T21:07:44+5:302026-05-02T21:08:16+5:30
किलर बीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आक्सा बीच वर आज जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे चार मुलांचे प्राण वाचले...

आक्सा बीच वर जीवरक्षकांची तत्परता, चार मुलांचे प्राण वाचले
मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमुळे समुद्रकिनाऱ्यावर गर्दी वाढली असून डुबण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशाच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मालाड पश्चिम येथील किलर बीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आक्सा बीच वर आज जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे चार मुलांचे प्राण वाचले.
पहिली घटना दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. विशाल चिला (वय १३) हा समुद्रात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अडचणीत सापडला. त्यावेळी जवळच तैनात असलेले जीव रक्षक सुपरवायझर भावेश तांडेल यांनी तत्काळ परिस्थिती ओळखून धाव घेतली आणि त्याला सुरक्षित बाहेर काढले.
त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आयएनएस हमला परिसराच्या हद्दीजवळ आणखी एक घटना घडली. मालाड ओरलेम चर्च परिसरातून आलेले आरुष मांजरे (वय १४), संतोष हरिजन (वय १५) आणि मिल्टन चेट्टी (वय १६) हे तिघे समुद्रात उतरल्यानंतर ओहोटीच्या पाण्यामुळे आत खेचले गेले.
ही बाब येथील जीव रक्षक कॅप्टन नथुराम सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांना प्रसाद बाजी यांनीही मदत केली. दोघांनी मिळून तिघा मुलांना सुखरूप बाहेर काढले.
या दोन्ही घटनांमुळे समुद्रात उतरताना खबरदारी घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना, विशेषतः मुलांना, समुद्रात जाताना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.