देशातील पहिल्या सर्वेक्षण योजनेतून १५ हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण, पाच हजारांना रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:21 IST2026-03-02T18:20:02+5:302026-03-02T18:21:01+5:30
सर्वेक्षणात कल जाणून घेणार, मग प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी मिळवून दिली जाणार

देशातील पहिल्या सर्वेक्षण योजनेतून १५ हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण, पाच हजारांना रोजगार
युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत २०४७’ हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा पायाभूत टप्पा आहे. शासनाच्या या संकल्पनेमध्ये युवकांच्या क्षमतेचा कल जाणून घेणारी ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजना देशातील अशी पहिलीच सर्वेक्षण योजना आहे. रोजगार निर्मितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. यात प्रशिक्षण आणि रोजगार दोन्हीची संधी असणार आहे, त्यामुळे हे सर्वेक्षण राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
१५००० जणांना प्रशिक्षण, ५००० रोजगार
आशिष शेलार म्हणाले, "भारताकडे लोकसंख्येचे सामर्थ्य आहे. युवकांना योग्य दिशा, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीची संधी मिळत असल्याने भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करू शकतो. ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ हा युवकांच्या क्षमता आणि कौशल्य कल जाणून घेण्यासाठीचा देशातील पहिला उपक्रम आहे. एआय-आधारित आणि पारदर्शक पद्धतीने १८ ते ४० वयोगटातील युवकांचा सर्वेक्षणाद्वारे डेटा संकलित करुन त्याआधारे युवकांची कौशल्ये ओळखून त्यांना प्रशिक्षण संस्थांशी जोडले जाईल. या सर्वेक्षणानंतर २०२७ पर्यंत सुमारे १५ हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचा आणि त्यापैकी पाच हजार युवकांना रोजगार किंवा उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा संकल्प आहे. यासाठी उद्योग, विविध कंपन्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी समन्वय साधून रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी साखळी व्यवस्था उभी केली जाईल. यासाठी शासनाबरोबरच महाविद्यालयांनी आणि युवकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे."
सक्षम कौशल्य सर्वेक्षण योजनेविषयी...
- सक्षम कौशल्य सर्वेक्षण योजनेचा उद्देश १८ ते ४० वयोगटातील पुरुष व महिला उमेदवारांचा कल लक्षात घेऊन संबंधित उमेदवारांना प्रशिक्षणाअंती रोजगारक्षम बनविणे हा आहे.
- मुंबई उपनगर जिल्ह्यात सापिओ ॲनालायटीक या संस्थेद्वारे एच पश्चिम वार्डातील जवळपास 55 हजार घरी भेट आणि एआय आधारित सर्वेक्षण करण्यात येईल. सर्वेक्षणांतर्गत प्रत्येक घरातील उमेदवारांची विहित नमुन्यामध्ये माहिती जमा करण्यात येईल व त्यांचा कल जाणून घेण्यात येईल.
- संबंधित उमेदवारांना शासनाद्वारे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येईल आणि उपलब्ध अधिकृत कौशल्य प्रशिक्षण संस्थेची माहिती दिली जाईल.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत प्रशिक्षण संस्थेद्वारे नजीकच्या उद्योजक/ आस्थापना येथे उमेदवारांना प्रशिक्षण संस्थेद्वारे रोजगार/ स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल.
- असे सर्वेक्षण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिल्यांदाच करण्यात येत आहे.