अपहृत चिमुरड्याची सुटका

By Admin | Updated: August 31, 2015 03:07 IST2015-08-31T03:07:35+5:302015-08-31T03:07:35+5:30

अवघ्या २० हजार रुपयांसाठी ४९ वर्षीय बेरोजगार इसमाने ३ वर्षीय चिमुरड्याचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदेश दत्ताराम परब (४९) असे आरोपीचे नाव आहे

Hijacked Chimudra released | अपहृत चिमुरड्याची सुटका

अपहृत चिमुरड्याची सुटका

मुंबई : अवघ्या २० हजार रुपयांसाठी ४९ वर्षीय बेरोजगार इसमाने ३ वर्षीय चिमुरड्याचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदेश दत्ताराम परब (४९) असे आरोपीचे नाव आहे. अवघ्या २४ तासांत कांजूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून, चिमुरड्याची सुटका केली आहे.
भांडुप पूर्वेकडील शिवकृपा चाळीमध्ये तीन वर्षीय सोनू (नाव बदललेले आहे़) आई, वडील आणि बहिणीसोबत राहतो. २७ आॅगस्टला घरासमोर खेळणारा सोनू अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी कांजूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्हींमध्ये आरोपी परब कैद झाला होता. मात्र त्याची ओळख पटण्यास अडचण येत होती. त्यानंतर भांडुप, नाहूर, कांजूर रेल्वे स्थानकाबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये कांजूर रेल्वे स्थानकाबाहेरील फुटेजमध्ये परबचा चेहरा स्पष्ट दिसला. पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच २८ आॅगस्टला परबने सोनूला भांडुप फाटक परिसरात सोडून दिले आणि कुणाला संशय येऊ नये, म्हणून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सोनूला ताब्यात घेतले. त्यानंतर भांडुप रेल्वे स्थानकात परबला अटक केली. कांजूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ए. एल. सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कांजूर पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर, पोलीस निरीक्षक पुंडलिक चेटे, एपीआय शेखर मोरे आणि यांचे पथक आरोपीचा शोध घेत होते.

Web Title: Hijacked Chimudra released