जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

By Admin | Updated: June 19, 2015 01:05 IST2015-06-19T01:05:38+5:302015-06-19T01:05:38+5:30

जिल्ह्यात गुरुवार १८ जून सकाळी आठ वाजल्यापासून रविवार २१ जून सकाळी आठ वाजेपर्यंतच्या ७२ तासांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा

Highest Warning in the district | जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग : जिल्ह्यात गुरुवार १८ जून सकाळी आठ वाजल्यापासून रविवार २१ जून सकाळी आठ वाजेपर्यंतच्या ७२ तासांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य धोके लक्षात घेवून जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील संभाव्य ८४ दरडग्रस्त गावांना सतर्कता व सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
संभाव्य दरडग्रस्त ८४ गावांमध्ये महाड तालुक्यात ३२, पोलादपूरमध्ये २५, म्हसळा तालुक्यात ४, श्रीवर्धन, तळा, पाली तालुक्यांत प्रत्येकी एक, खालापूरमध्ये ६, कर्जतमध्ये ३, मुरुड व पनवेलमध्ये प्रत्येकी २, रोहा तालुक्यांत ४, माणगावमध्ये ३ गावांचा समावेश असून या सर्व गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे पाठक यांनी पुढे सांगितले.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, विभागाकडील शोध व बचाव पथक, बचाव साहित्य, रुग्णवाहिका आदि सुविधा तत्पर ठेवण्यात याव्यात. तसेच प्रशासकीय प्रमुखांनी या काळात परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, मोबाइल बंद ठेवू नयेत, अशा सक्त सूचना रायगड जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये याबाबत सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टी होत असल्यास ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे, अशा सूचनाही संबंधित तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.
समुद्र खवळला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, पर्यटकांनी समुद्रामध्ये पोहण्यास जाऊ नये, वाहतूक सुरक्षित राहील याची दक्षताही घ्यावी, दैनंदिन घडलेले अपघात, झाड पडणे, पाणी थांबणे इत्यादी बाबींचा अहवाल तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहे.

Web Title: Highest Warning in the district