स्ट्रोकवर रोबोटिकद्वारे ‘गोल्डन अवर’ उपचार, ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 08:37 IST2026-05-17T08:37:15+5:302026-05-17T08:37:41+5:30
आरोग्यसेवा आयुक्तालयात आरोग्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली त्या अनुषंगाने प्राथमिक बैठक झाली.

स्ट्रोकवर रोबोटिकद्वारे ‘गोल्डन अवर’ उपचार, ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही वर्षांत स्ट्रोक (पक्षाघात) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या अशा रुग्णाना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यावेळी तज्ज्ञ डॉक्टर व आधुनिक सुविधा वेळेत न मिळाल्यास रुग्णाला कायमस्वरूपी पक्षाघाताचा धोका वाढतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन तालुका व जिल्हास्तरीय शासकीय रुग्णालयांमध्ये स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक “रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत.
आरोग्यसेवा आयुक्तालयात आरोग्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली त्या अनुषंगाने प्राथमिक बैठक झाली. बैठकीला खासदार मा. डॉ. अनिल बोंडे, आमदार मा. उमा खापरे, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, केईएमचे वरिष्ठ हायब्रिड न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे उपस्थित होते.
मुंबईतील केईएम रुग्णालयात रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे स्ट्रोक रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा चाचणी २०२० मध्ये करण्यात आली होती. या रुग्णालयातील वरिष्ठ हायब्रिड न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध करून देणेबाबत विचार सुरू आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना “हब आणि स्पोक” प्रणालीद्वारे “रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” सुविधा देण्यात येणार आहे.
राज्यात ११ ठिकाणी कॅथलॅब सुरू करणार
केईएम रुग्णालय येथे मुख्य रोबोटिक नियंत्रण केंद्र (हब) कार्यरत असेल, तर जिल्हा व तालुकास्तरीय रुग्णालयांमध्ये दुय्यम रोबोटिक प्रणाली (स्पोक सेंटर) कार्यरत असतील. संगणकीय आणि दूरसंचार प्रणालीद्वारे हे दोन्ही घटक एकमेकांशी जोडले जातील.
मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर आपल्या नियंत्रण प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये उपस्थित वैद्यकीय पथकाच्या मदतीने न्यूरोअँजिओग्राफी, स्ट्रोक इंटरव्हेन्शन प्रक्रिया पार पाडतील. आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात ११ ठिकाणी कॅथलॅब सुरू करण्यात येत आहेत.
यापैकी पाच केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर “रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” सुविधा सुरू करण्याचा विचार आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर ही योजना टप्प्याटप्प्याने राज्यभर विस्तारण्यात येणार आहे.