एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 12:31 IST2026-04-14T12:22:08+5:302026-04-14T12:31:17+5:30
Mumbai Suburban Railway: मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये भारतातील पहिली स्वयंचलित दरवाजा बंद होणारी नॉन एसी लोकल सोमवारी ५:०० वाजता दाखल झाली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिचा सांगाडा हा एसी लोकलचा असून, काही उपकरणदेखील एसी लोकलचीच आहेत.

एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
मुंबई - मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये भारतातील पहिली स्वयंचलित दरवाजा बंद होणारी नॉन एसी लोकल सोमवारी ५:०० वाजता दाखल झाली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिचा सांगाडा हा एसी लोकलचा असून, काही उपकरणदेखील एसी लोकलचीच आहेत. परंतु, यामध्ये काही आसनसंख्या कमी करून उभ्या प्रवाशांसाठी जागा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, या लोकलची एकूण ५ हजार ७०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.
नवीन नॉन एसी १२ डब्यांच्या लोकलमध्ये एकूण १९ कम्पार्टमेंट असून, त्यात फर्स्ट क्लास, लेडीज फर्स्ट क्लास, दिव्यांगांसाठी विशेष डबे, महिलांसाठी सेकंड क्लास, सामानासाठी डबे आणि सर्वसाधारण सेकंड क्लास अशा विविध श्रेणींचा समावेश आहे. सीटचा आकार कमी केला असून उभे राहण्यासाठी अतिरिक्त जागा देण्यात आली आहे.
...अशी आहे संरचना
दोन्ही टोकांना लगेज कंपार्टमेंट आहेत. मोठ्या खिडक्या, लुव्हर असलेले दरवाजे व १२ डब्यांच्या रचनेत ३ व्हेस्टिब्यूल कोचेस तसेच १,००३ आसने आहेत, जी नियमित गाड्यांतील १,०२८ आसनांपेक्षा कमी आहेत. प्रत्येक डब्यात दोन एअर - इंटेक युनिट्स असून, ते ताशी १०,००० क्यूबिक मीटर ताजी हवा
आत ढकलतात.
अतिरिक्त फर्स्ट क्लास डबा
या गाडीत एक अतिरिक्त फर्स्ट क्लास डबा देण्यात दिला आहे. १२ डब्यांची रचना तीन भागांत विभागली आहे. एक ६ डब्यांचा आणि दोन ३-डब्यांचे स्वतंत्र विभाग. पहिल्या सहा डब्यांमध्ये फर्स्ट व सेकंड क्लास तसेच लगेज विभाग असेल, तर उर्वरित विभागांमध्येही फर्स्ट क्लास डबे असतील. एकूण ४ फर्स्ट क्लास
डबे असतील.
सध्याची आणि नवीन नॉन-एसी लोकलमधील फरक
दरवाजातून हवा खेळती राहणे:
सध्याची: खालच्या भागात फट
नवीन: दरवाजाच्या २/३ भागात लुव्हर ग्रिल
खिडकीचा आकार:
सध्याची: ८०० मिमी (पुश-डाउन)
नवीन: १९०० मिमी (स्लायडिंग)
छतावरील व्हेंटिलेशन:
सध्याची: प्रति पॅनेल ६,००० क्यूबिक मीटर/तास
नवीन: प्रति पॅनेल १०,००० क्यूबिक मीटर/तास
आसन व उभे प्रवासी:
सध्याची: १,०२८ आसने / २,३३६ उभे
नवीन: १,००३ आसने / ४,६९५ उभे
पावसाळ्यात गैरसोय होऊ नये, यासाठी अँटी-वॉटर इन्ग्रेस फीचर्स आहेत.