ड्रग्जसाठी स्नॅपचॅटद्वारे सुरू होते आर्थिक व्यवहार, कॉलेजातील आणखी एका विद्यार्थ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:49 IST2026-04-17T12:49:03+5:302026-04-17T12:49:41+5:30
Mumbai Drugs News: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात व्हॉट्सॲपद्वारे संवाद साधून स्नॅपचॅटद्वारे आर्थिक व्यवहार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून उघडकीस आली आहे. आरोपींनी व्हॉट्सॲपवरील महत्त्वाचे चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे नष्ट केले आहेत.

ड्रग्जसाठी स्नॅपचॅटद्वारे सुरू होते आर्थिक व्यवहार, कॉलेजातील आणखी एका विद्यार्थ्याला अटक
मुंबई - नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात व्हॉट्सॲपद्वारे संवाद साधून स्नॅपचॅटद्वारे आर्थिक व्यवहार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून उघडकीस आली आहे. आरोपींनी व्हॉट्सॲपवरील महत्त्वाचे चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे नष्ट केले आहेत. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुरुवारी मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील बीकॉमचा विद्यार्थी विनीत गेरेलानी (२२) याला अटक केली. स्नॅपचॅटद्वारे क्यूआर कोड पाठवून पैसे स्वीकारल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली.
गेरेलानीसह अटकेतील सहाही आरोपीना गुरुवारी बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या तपासात, आरोपी प्रतीक पांडे याने, आनंद पटेलकडून एक्स्टॅसी (एमडीएमए) घेतल्याची कबुली दिली आहे. आनंदने २० गोळ्या दिल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
अन्य तरुणांकडून ड्रग्जच्या गोळ्या घेऊन त्या फरार आरोपीच्या मदतीने पांडेला पुरविल्याची कबुली आनंदने दिली. त्यानुसार, फरार आरोपीचाही शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
नेस्को कर्मचारीही गुंतले आहेत का?
आरोपी एकेमकांशी वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे संपर्कात होते. आवश्यकतेनुसार, ड्रग्जसाठी स्नॅपचॅटद्वारे ते संपर्कात होते, तर क्यूआर कोड पाठवून पैसे स्वीकारले जात होते.या व्यवहारात कार्यक्रमाचे आयोजक तसेच नेस्कोच्या कर्मचाऱ्यांचा काही संबंध आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
आरोपी सतत संपर्कात
पोलिसांनी आरोपींचे मोबाइल सीडीआर काढले असून ते सतत एकेमकांच्या संपर्कात होते, हे स्पष्ट झाले आहे. यातील दोन फरार आरोपीही कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यातील कॉल रेकॉर्डवरून पोलिस विनीतपर्यंदत पोहोचले.
तो उल्हासनगरचा रहिवासी आहे. त्याचा मोबाईल तपासला असता स्नॅपचॅटद्वारे अमली पदार्थविक्री करून आर्थिक व्यवहार केल्याचे आढळले. त्याचे चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले. त्याच्या खात्यावर पैसेही आले आहेत.
फरार आरोपी आणि गेरेलानी यांचा संपर्क झाल्याचे तपासात निष्पन्न होताच अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेतील आरोपी आणि नेस्को कार्यक्रमाचे आयोजक व अन्य कर्मचाऱ्यांचे सीडीआर काढून त्याचे विश्लेषण करून अंमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या संशयितांबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.