मनोरंजनाचे ठिकाण अखेर स्मशानभूमीत बदलले; कॉन्सर्टमधील ड्रग ओव्हरडोसमुळे मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयाची टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:44 IST2026-05-09T11:42:27+5:302026-05-09T11:44:15+5:30
जामीन अर्ज फेटाळला. ‘पैशाच्या हव्यासातून झालेल्या खराब व्यवस्थापनामुळे मनोरंजनाचे ठिकाण अखेर स्मशानभूमीत बदलले,’ अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

मनोरंजनाचे ठिकाण अखेर स्मशानभूमीत बदलले; कॉन्सर्टमधील ड्रग ओव्हरडोसमुळे मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयाची टिप्पणी
मुंबई : गोरेगाव नेस्को प्रदर्शन केंद्रात टेक्नो म्युझिक कॉन्सर्टदरम्यान संशयित ड्रग ओव्हरडोसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विशेष एनडीपीएस न्यायालयाने प्रमुख आयोजकांचा
जामीन अर्ज फेटाळला. ‘पैशाच्या हव्यासातून झालेल्या खराब व्यवस्थापनामुळे मनोरंजनाचे ठिकाण अखेर स्मशानभूमीत बदलले,’ अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
नेल पॉलिश की 'स्लो पॉयझन'? नखं सजवण्याच्या नादात आरोग्याशी खेळू नका; पाहा धक्कादायक वास्तव
११ एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमात दोन एमबीए विद्यार्थ्यांचा संशयित ड्रग ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला होता, तर अनेक जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. प्राथमिक अहवालानुसार, मृतांनी एमडीएमए (एक्स्टसी) गोळ्यांचे सेवन केले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे अशी गंभीर लक्षणे दिसून आली होती.
विशेष एनडीपीएस न्यायालयाचे न्यायाधीश यू. सी. देशमुख यांनी गुरुवारी चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. यामध्ये कार्यक्रम आयोजक तसेच आरोपी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
शुक्रवारी उपलब्ध झालेल्या सविस्तर आदेशांमध्ये न्यायालयाने आयोजक सनी विनोद जैन आणि बालकृष्णन कुरुप यांच्याकडून झालेल्या गंभीर नियमभंगांचा तसेच आरोपी विद्यार्थी प्रतीक पांडे आणि रौनक खंडेलवाल यांनी अमली पदार्थांचे वितरण केल्याचा उल्लेख केला.
एका आदेशात न्यायालयाने घटनास्थळ पंचनाम्याचा आणि तेथून जप्त करण्यात आलेल्या रिकाम्या मद्याच्या बाटल्यांचा उल्लेख करीत आयोजकांनी कार्यक्रमस्थळी उपस्थितांना मद्यपान करण्यास मुभा दिल्याचे नमूद केले.
‘कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून अमली पदार्थ किंवा मद्य आत आणले जाणार नाही आणि त्याचा वापर किंवा सेवन होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आयोजकांवर होती,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. हे कार्यक्रम व्यवस्थापनातील गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचेही न्यायालयाने म्हटले.
दुर्घटनेसाठी आयोजक प्रथमदर्शनी जबाबदार
‘हे कृत्य जाणूनबुजून, निष्काळजीपणातून किंवा पैशाच्या हव्यासातून झाले असू शकते. मात्र, या कृतीचे रूपांतर दुर्दैवी घटनेत झाले असून, मनोरंजनाचे ठिकाण अखेर दोन व्यक्तींच्या मृत्यूमुळे स्मशानभूमीत बदलले. त्यामुळे या निष्काळजीपणासाठी आणि कार्यक्रमातील दुर्घटनेसाठी आयोजक प्रथमदर्शनी जबाबदार आहेत,’ असे कोर्टाने नमूद केले.
न्यायालयाचा निष्कर्ष काय?
दुसऱ्या आदेशात न्यायालयाने आरोपी प्रतीक पांडे हा कार्यक्रमस्थळी उपस्थित होता आणि व्यवस्थापनातील गोंधळाचा फायदा घेत अमली पदार्थ विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे निरीक्षण नोंदवले.
प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने आरोपींना जामीन दिल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो तसेच सरकारी साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे आरोपी जामिनास पात्र नसल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला.