पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनांना आर्थिक पंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST2021-02-05T04:25:51+5:302021-02-05T04:25:51+5:30

नाईटलाईफ, खाद्य केंद्रांसाठी तरतूद; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनांना आर्थिक पंख लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ...

Economic wings to Tourism Minister Aditya Thackeray's concept | पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनांना आर्थिक पंख

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनांना आर्थिक पंख

नाईटलाईफ, खाद्य केंद्रांसाठी तरतूद; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनांना आर्थिक पंख

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ संकल्पनेला कोविड काळात ‘ब्रेक’ लागला. मात्र, आगामी आर्थिक वर्षात रात्रीच्या वेळी खाऊगल्ल्या तयार करण्याची घोषणा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केली आहे. लोकप्रिय खाद्यपदार्थांची विक्री करणारे ३०हून अधिक विक्रेते, दुकाने, स्टॉल्स यांच्या समूहांचा समावेश खाद्य केंद्रांमध्ये करण्यात येईल. ही खाद्य केंद्र रात्री ११ ते सकाळी ६ यावेळेत सुरू राहतील.

यासाठी अंदाजे ३,३३१ विक्रेते सामावून घेण्याची क्षमता असलेल्या ६५ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. त्याची एकूण लांबी ११ किलोमीटर आहे. पदपथ, वाहतूक बेट, उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागा आणि भिंतीचे सुशोभिकरण आणि रस्त्यावरील खाद्य केंद्रासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद आगामी आर्थिक वर्षात महापालिकेने केली आहे.

* मराठी रंगभूमी कलादालन

राज्य सरकारने गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राचा मराठी रंगभूमी कलादालन म्हणून पुनर्विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पुनर्विकासाच्या कामासाठी १७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च राज्य सरकार करणार आहे. राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी महापालिकेला निधी उपलब्ध होणार असल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.

* वरळीला मत्स्यालय

वरळी डेअरीतील जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय आणि सागरी संशोधन केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी पाचशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून भूखंड आणि निधी दिला जाणार आहे.

---------------------

Web Title: Economic wings to Tourism Minister Aditya Thackeray's concept