पुष्पकनगरचा विकास दृष्टिक्षेपात

By Admin | Updated: June 23, 2015 01:08 IST2015-06-23T01:08:23+5:302015-06-23T01:08:23+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये विकसित भूखंड देण्यात आले आहेत. त्यासाठी सोडत प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली

Development vision of Pushpaknagar | पुष्पकनगरचा विकास दृष्टिक्षेपात

पुष्पकनगरचा विकास दृष्टिक्षेपात

कमलाकर कांबळे, नवी मुंबई
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये विकसित भूखंड देण्यात आले आहेत. त्यासाठी सोडत प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. मात्र पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी प्रस्तावित पुष्पकनगरचा विकास खोळंबला आहे. असे असले तरी, आता संबंधित विभागाची कार्यकारिणी समिती अस्तित्त्वात आली आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून पर्यावरण विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत रखडलेला पुष्पकनगरचा विकास आता दृष्टिक्षेपात आला आहे.
नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी १५९७ हेक्टर जमीन सिडकोने यापूर्वीच संपादित केली आहे. बारा महसुली गावांतील उर्वरित ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या संपादित जमिनीच्या मोबदल्यात संबंधित खातेधारकांना २२.५ टक्के योजनेअंतर्गत भूखंड देण्यात येणार आहेत. त्याबाबतची सोडतही काढण्यात आली आहे. हे सर्व भूखंड नव्याने विकसित होणाऱ्या पुष्पकनगर नोडमध्ये देण्यात आले आहेत. सध्या पुष्पकनगरच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.
जमीनचे सपाटीकरण करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सेवा-सुविधा उपलब्ध करण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार सिडकोने राज्याच्या पर्यावरण विभागाकडे यापूर्वीच तशा आशयाचा अर्ज केला आहे. मात्र संबंधित विभागाची कार्यकारिणी समितीच अस्तित्वात नसल्याने ही प्रक्रिया रखडली होती. परंतु आता संबंधित समिती अस्तित्वात आल्याने पुढील आठ-दहा दिवसांत परवानगी प्राप्त होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.

Web Title: Development vision of Pushpaknagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.