“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:59 IST2026-04-14T14:58:36+5:302026-04-14T14:59:23+5:30
Deputy CM Eknath Shinde: मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य स्मारकाच्या कामाला वेग आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde: बाबासाहेब हे केवळ संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचेही शिल्पकार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हाच आपला राष्ट्रधर्म आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाच्या मूल्यांचा गौरव करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळेच देशातील शेवटच्या माणसाला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चवदार तळ्याच्या सत्याग्रहासारख्या ऐतिहासिक आंदोलनांनी दलित आणि वंचित समाजात आत्मसन्मान जागवला, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झाले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ पासून सुरू केलेल्या संविधान दिनाचा उल्लेख करत, संविधानाच्या सन्मानाची परंपरा अधिक बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले. “आज सामान्य कुटुंबातील व्यक्ती देशाचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो, हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झाले आहे,” असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य स्मारकाच्या कामाला वेग आल्याची माहिती दिली. या स्मारकामुळे बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव अधिक व्यापक पातळीवर पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आजचा दिवस हा केवळ जयंती नसून भारताच्या स्वाभिमानाचा आणि विवेकाचा उत्सव आहे. बाबासाहेबांचे विचार जपणे आणि ते आचरणात आणणे, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असे आवाहन करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.