BMC election Results 2026: काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीत निकालाआधीच झाला बेबनाव? भाजप, ठाकरे बंधूत हातमिळवणी झाल्याचा दावा
By जयंत होवाळ | Updated: January 16, 2026 07:24 IST2026-01-16T06:39:00+5:302026-01-16T07:24:52+5:30
BMC election Results 2026: वंचितने काँग्रेसवर असहकार्याचा आरोप केला

BMC election Results 2026: काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीत निकालाआधीच झाला बेबनाव? भाजप, ठाकरे बंधूत हातमिळवणी झाल्याचा दावा
जयंत होवाळ
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाआधीच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये बेबनाव सुरू झाला आहे. वंचितने काँग्रेसवर असहकार्याचा आरोप केला. त्याबरोबरच उद्धवसेना आणि भाजपलाही लक्ष्य केले. मतदानाच्या आदल्या रात्री भाजपच्या नेत्याने उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचा गंभीर आरोपही वंचितने केला. निवडणुकीनंतरही आमची युती कायम राहील, असे दोन्ही पक्षांच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र या युतीला निकालाआ सुरुंग लागल्याचे चित्र आहे.
वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी, काँग्रेसवर असहकार्याचा आरोप केला. ते म्हणाले, "काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे मुंबईच्या मतदारांना आवाहन करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. त्यात ते केवळ काँग्रेस उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसतात. त्यांनी कुठेही वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख केलेला आढळत नाही. त्यामुळे ही निवडणूक आपण आघाडीत लढलो की स्वतंत्र? याचे स्पष्टीकरण काँग्रेसने द्यावे." मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र वंचितचे सर्व आरोप फेटाळले.
भाजप, ठाकरे बंधूत हातमिळवणी झाल्याचा दावा
वंचितचे आणखी एक प्रवक्ते फारुख अहमद यांनी तर, भाजप आणि ठाकरे बंधूंचे साटेलोटे असून, निकालानंतर महापौर निवडीपर्यंत आपण एकत्र येऊ शकतो का, यादृष्टीने दोन्ही बाजूंमध्ये गुप्त बोलणी झाल्याचा दावा त्यांनी केला. "मतदानाच्या आदल्या रात्री मातोश्रीवर भाजपच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यालयातून मिश्रा नावाचे एक गृहस्थ आले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट घेतली.
मतदानाच्या दिवशी कोणकोणत्या जागांवर एकमेकांना मदत करायची आहे, याची चर्चा दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या बैठकीत झाल्याची आमची माहिती आहे", असाही दावा त्यांनी केला. मातोश्रीवर सीसीटीव्ही आहे. रात्री ३ वाजता कोण आले, कोण भेटले, हे लोकांसमोर आले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. संविधानवादी, सेक्युलर मतदारांनी ठाकरे बंधूंचे सगळे खेळ समजून घ्यावेत, असेही ते म्हणाले.
प्रचारात, सर्व सभांमध्ये वंचितच्या प्रत्येक नेत्याने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. काँग्रेसने मात्र फक्त आपल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. त्यामुळेच दोन्ही बाजूच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सिद्धार्थ मोकळे, प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी
आम्ही सहकार्य केले नाही, हे वंचितच्या प्रवक्त्यांचे मत चुकीचे आहे. आम्ही घेतलेल्या सभेत वंचितच्या उमेदवारांनाही विजयी करण्याचे आवाहन केले होते. वंचितचा काहीतरी गैरसमज झाला असावा. सचिन सावंत, मुख्य प्रवक्ते, मुंबई काँग्रेस