"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 08:09 IST2025-10-28T08:07:09+5:302025-10-28T08:09:49+5:30
BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाने आता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे

"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
वरळीच्या एनएससीआय डोम येथे उद्धवसेनेने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्धार मेळावा आयोजित केला होता. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबईत येऊन गेले. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मुंबई पालिकेची निवडणूक आम्हीच जिंकणार. निवडणुकीनंतर मुंबई भगवी करून दाखविल्याशिवाय राहणार नाही" असं म्हटलं आहे.
भाजपाने आता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "तीच मळमळ... त्याच उलट्या... नाव "विजयाचा संकल्प" आणि बोलण्याला पराभवाचा दर्प!!" असं म्हणत टीका केली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. "केंद्रीय मंत्री अमितभाई शाह हे मुंबईत येऊन गेले याची भीती आज निर्धार "मेळाव्याच्या चेहऱ्यावर" स्पष्ट दिसत होती. पराभवाची खात्री झालेय हे बोलण्यातून सतत डोकावत होते. एवढेच नवीन सोडले तर.. बाकी सगळे तेच ते आणि तेच ते..."
मा. केद्रीय मंत्री अमितभाई शाह हे मुंबईत येऊन गेले याची भिती आज निर्धार "मेळाव्याच्या चेहऱ्यावर" स्पष्ट दिसत होती.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 27, 2025
पराभवाची खात्री झालेय हे बोलण्यातून सतत डोकावत होते.
एवढेच नवीन सोडले तर..
बाकी सगळे तेच ते आणि तेच ते..
तीच रुदाली, तेच रडणे
तीच मळमळ... त्याच उलट्या..
त्याच…
"तीच रुदाली, तेच रडणे तीच मळमळ... त्याच उलट्या.. त्याच फुशारक्या.. आणि त्याच वायफाय शब्दांच्या कोट्या... कट्ट, गट्ट, पट्ट सारखा पांचटपणा ही तोच... नाव "विजयाचा संकल्प" आणि बोलण्याला पराभवाचा दर्प!!" असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे
निवडणुका होणार की नाही ते आम्ही ठरवू - ठाकरे
"लोकशाहीत मतदार सरकार निवडतात. पण, आता परिस्थिती अशी आली आहे की मतदार कोण हे सरकार ठरवीत आहे. मतदार यादीचा घोळ निवडणूक आयोगाने केला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदाराला ओळखणारा पोलिंग एजंट असला पाहिजे. निवडणूक आयोगाला सांगून ते जर ऐकणार नसतील तर बोगस मतदारांना आम्हीच थोपविणार. आयोगाने या गोष्टी सुधारल्या नाही तर निवडणुका होणार की नाही ते आम्ही ठरवू" असा इशारा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला.