पालिका मुख्यालयासाठी बदलापूरला १४ कोटी

By Admin | Updated: June 9, 2015 22:00 IST2015-06-09T22:00:40+5:302015-06-09T22:00:40+5:30

मुख्यमंत्र्यांनी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृहासाठी १४ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

Badlapur has 14 crores for municipal headquarter | पालिका मुख्यालयासाठी बदलापूरला १४ कोटी

पालिका मुख्यालयासाठी बदलापूरला १४ कोटी

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपरिषद कार्यालय हे एका रुग्णालयात सुरू असून पालिकेसाठी स्वत:ची इमारत नाही. ती उभारण्यासाठी निधीची गरज होती. हे ओळखूनच मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृहासाठी १४ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे बदलापूर पालिकेला आता कर्ज ने घेता स्वत:ची प्रशासकीय इमारत उभारता येणार आहे.
बदलापूर पालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. या वेळी त्यांनी बदलापूर पालिका प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृहासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. बदलापूर पालिकेत भाजपाची सत्ता नसली तरी मुख्यमंत्र्यांनी आपले आश्वासन पूर्ण केले आहे. प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृहासाठी १४ कोटी १४ लाखांचा भरीव निधी मंजूर केल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.
राज्यातील एकूण १३ पालिकांसाठी शासनाने ५१ कोटी ९४९ लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केलेला आहे. त्यात बदलापूर पालिकेला सर्वात जास्त १४ कोटी १४ लाख रु पये मिळाल्याचे ते म्हणाले. अन्य पालिकांना १ ते ५ कोटींचा निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले. या कामावर लक्ष ठेवण्यासाठी त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत केली आहे. ही समिती चार जणांची असणार आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता, पालिकेचे मुख्याधिकारी व नगर प्रशासनाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
याबाबत मुख्याधिकारी देविदास पवार यांना विचारले असता त्यांनी निधी मंजूर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शासनाकडून तसे पत्र आलेले आहे. याबाबतीत पूर्वेकडील कात्रप परिसरात पाच विकासकामांसाठी आरक्षण मंजूर असलेले भूखंड आहेत. प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृह यासाठी या जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश नगर रचनाकाराला देण्यात आले असून त्यांचा लवकरच अहवाल मागविण्यात येणार आहे. या अहवालानंतर काम सुरू करण्यात येईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Badlapur has 14 crores for municipal headquarter