पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

By Admin | Updated: August 4, 2014 00:58 IST2014-08-04T00:58:21+5:302014-08-04T00:58:21+5:30

गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने आता आरोग्याची काळजी घेणेसुध्दा महत्वाचे ठरणार आहे.

Appeal to take care of health in the monsoon | पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने आता आरोग्याची काळजी घेणेसुध्दा महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर हरिश्चंद्र पाटील आणि महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी केले आहे.
सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठविलेल्या किंवा साचलेल्या स्वच्छ पाण्यात, धुणी-भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे उघडे ड्रम्स, घराच्या आसपास पडलेल्या नारळाच्या करवंट्या, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे हौद, हवाबंद झाकण नसलेले हाऊसिंग सोसायट्यांचे ओव्हरहेड टँक्स यांत पाणी साचून डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरिन वापरावे, घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, शिळे, उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत, साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, सात दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेवू नये, साठविलेल्या पाण्याच्या ड्रम्सवर घट्ट झाकण बसवावे. सेफ्टी टँक त्वरित दुुरुस्त करुन घ्यावी आणि सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. तर पावसाळ्यात ताप आल्यास लगेचच नजीकच्या महापालिकेच्या रुग्णालयात, आरोग्य केंद्रात जाऊन रक्ताची तपासणी करावी तसेच घरातील व्यक्ती हिवताप, डेंग्युु फिव्हर, कावीळ, हगवण, लेप्टोस्पायरोसीस आदी साथींच्या रोगांनी आजारी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तत्काळ नजीकच्या महापालिकेच्या दवाखान्यात अथवा आरोग्य विभागाकडे देऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title: Appeal to take care of health in the monsoon