जादा शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:10 IST2020-12-05T04:10:53+5:302020-12-05T04:10:53+5:30

मुंबई : राज्यातील रक्तपेढ्यांनी आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात ...

Action on blood banks that charge extra | जादा शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाई

जादा शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाई

मुंबई : राज्यातील रक्तपेढ्यांनी आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवरील कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. यासंदर्भात शासन निर्णयदेखील जाहीर करण्यात आला आहे.

राज्यामध्ये रक्तपेढ्यांकडून विविध गैरप्रकार केले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यात थॅलेसीमिया रुग्णांना रक्त न देणे, त्यांच्याकडून प्रक्रिया शुल्क घेणे, संकेतस्थळावर दररोजचा साठा न दर्शविणे तसेच प्लाझ्मा रक्त पिशवीसाठी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अवाजवी रक्कम आकारणे अशा तक्रारी आहेत. यापुढे अशा रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. राष्ट्रीय तसेच राज्य रक्त संक्रमण परिषद आणि सरकारने ठरवून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त रक्कम घेतल्यास पाच पट दंड वसूल केला जाईल.

थॅलेसीमिया, हिमोफिलिया, सिकलसेल व रक्ताशी निगडित इतर आजारी रुग्णांकडे मोफत रक्त मिळण्याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेने जारी केलेले ओळखपत्र असतानाही अशा रुग्णांकडून पैसे घेतल्यास प्रक्रिया शुल्काच्या तीनपट दंड आकारला जाईल. तसेच या रुग्णांना रक्त वितरण करण्यास नकार दिल्यास रुग्णास द्यावे लागलेले प्रक्रिया शुल्क अधिक एक हजार रुपये दंड आकारला जाईल.

Web Title: Action on blood banks that charge extra