दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 08:21 IST2024-11-10T08:20:58+5:302024-11-10T08:21:16+5:30

बापाने बालिकेच्या नाजूक भागात लाटणे घुसवून तिचा गळा आवळला. पोलिसांनी विकृताला अटक केली आहे. 

A two year old girl was tortured and killed | दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य

दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई  : नात्यात अडथळा ठरत असल्याच्या रागातून एका नराधमाने आपल्या दोन वर्षांच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना मानखुर्द येथे घडली. या बापाने बालिकेच्या नाजूक भागात लाटणे घुसवून तिचा गळा आवळला. पोलिसांनी विकृताला अटक केली आहे. 

या बालिकेच्या आईने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दोघीही मायलेकी आरोपीबरोबर राहत होत्या. आरोपीला ही मुलगी नात्यातला अडसर वाटू लागली. त्यावरून त्यांच्यात खटके उडू लागले. आरोपी मुलीवर राग काढू लागला. या मुलीची आई शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे घरकामासाठी बाहेर पडली. ती दुपारी घरी परतली तेव्हा मुलगी बेशुद्धावस्थेत होती. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. 

बलात्कार करून  गळा आवळला
या मुलीच्या अंगावर मारहाणीच्या आणि गळा आवळल्याच्या खुणा आढळल्या. तिच्या नाजूक भागावर जखमा होत्या. रक्तस्त्रावही होत होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिस खाक्या दाखवताच त्याने मुलीवर अत्याचाराची आणि हत्येची कबुली दिली. आरोपीवर भारतीय न्याय संहितेसह पोक्सो कायद्यातील गंभीर कलमांनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A two year old girl was tortured and killed