पहिल्या सर्वसाधारण सभेत १९६ प्रस्ताव

By Admin | Updated: June 19, 2015 01:33 IST2015-06-19T01:33:16+5:302015-06-19T01:33:16+5:30

महापौर निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये तब्बल १९६ प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये १८० प्रस्ताव

196 proposals in the first general meeting | पहिल्या सर्वसाधारण सभेत १९६ प्रस्ताव

पहिल्या सर्वसाधारण सभेत १९६ प्रस्ताव

नवी मुंबई : महापौर निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये तब्बल १९६ प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये १८० प्रस्ताव हे नगरसेवकांचे आहेत. विषय समिती, प्रभाग समिती सदस्य व स्वीकृत नगरसेवकांच्या नावावरही शिक्कामोर्तब होणार आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये १११ पैकी ८७ नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. नवीन नगरसेवकांच्या कामाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. नगरसेवकही सभागृहात छाप पाडण्यासाठी उत्सुक असल्याचे सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवरून स्पष्ट झाले आहे. महापौर निवडणूक झाल्यानंतर पहिली सभा शुक्रवारी होत आहे. पहिल्याच सभेत विक्रमी १९६ प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत. यामध्ये नगरसेवकांनी मांडलेल्या १८० ठरावांचा समावेश आहे. आतापर्यंत एकाच वेळी एवढे ठराव कधीच मंजुरीसाठी आले नव्हते. बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात प्रसाधनगृहापासून शाळा सुरू करण्यापर्यंत अनेक सुविधा मार्गी लावण्यासाठीची मागणी केली आहे. अनेक धोरणात्मक विषयांचे ठरावही मांडले आहेत. यामुळे या ठरावांवर चर्चा होणार की सरसकट मंजूर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पक्षीय संख्याबळाप्रमाणे पाच स्वीकृत नगरसेवकांची निवडही रखडली आहे. राष्ट्रवादीने ३ जागांसाठी ४ अर्ज भरले आहेत. शिवसेनेने २ जागांसाठी ४ अर्ज व भाजपा व काँगे्रसने पुरेसे संख्याबळ नसतानाही अर्ज भरले आहेत. यामुळे कोणाची या पदावर नियुक्ती होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ९ विषय समित्यांच्या सदस्यांचीही नियुक्ती होणार आहे. परिवहन समितीमधील काही सदस्य निवृत्त होणार असून संख्याबळाप्रमाणे सदस्यांची नियुक्ती होणार आहे. कोणाची वर्णी लागणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

Web Title: 196 proposals in the first general meeting