मालेगावात एका घरात आढळले ८०० मतदान कार्ड
By संदीप भालेराव | Updated: January 15, 2026 15:59 IST2026-01-15T15:58:24+5:302026-01-15T15:59:00+5:30
Malegaon Municipal Corporation Election: मालेगावातील २१ प्रभागांमधील ८३ जागांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत काही ठिकाणी गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत. एका ठिकाणी एकाच घरात जवळपास ८०० मतदान कार्ड आढळून आले.

मालेगावात एका घरात आढळले ८०० मतदान कार्ड
मालेगाव (नाशिक) - मालेगावातील २१ प्रभागांमधील ८३ जागांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत काही ठिकाणी गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत. एका ठिकाणी एकाच घरात जवळपास ८०० मतदान कार्ड आढळून आले. तर एका मतदान केंद्रावर बोगस मतदानाच्या संशयावरून काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने वाद निवळला.
येथील सर्व्हे नंबर ५५ मधील मनपा शाळा क्रमांक ६३ येथील निवडणूक केंद्राशेजारील एका घरात सकाळी प्लास्टिकच्या एका पिशवीत सुमारे ८०० पेक्षा जास्त मतदान कार्ड आढळून आले. सदर कार्ड जप्त करून घेऊन जाणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घालत त्यांना जागेवर पंचनामा करण्याची मागणी केल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सदरचे कार्ड ताब्यात घेतले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात सदर कार्ड खरे असल्याची माहिती दिली आहे. मात्र, या घटनेमुळे मालेगावात बोगस मतदानाबाबत चर्चा होत आहे. अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती दिसून आली.