दुर्लक्ष केले तर पडू शकतो उमेदवार, या गटात ‘ती’ची पॉवर! ज्येष्ठ महिलाच ठरविणार आमदार
By नितीन चौधरी | Updated: October 20, 2024 13:30 IST2024-10-20T13:29:49+5:302024-10-20T13:30:33+5:30
७० ते १२० वयोगटातील मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त

दुर्लक्ष केले तर पडू शकतो उमेदवार, या गटात ‘ती’ची पॉवर! ज्येष्ठ महिलाच ठरविणार आमदार
नितीन चौधरी, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: महिला या पुरुषांपेक्षा जास्त जगतात हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे. याचाच प्रत्यय मतदारांच्या आकडेवारीतूनही स्पष्ट होत असून, राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीत ७० ते १२० पेक्षा अधिक वय असलेल्या गटातील पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण जास्त आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या या वयोगटात राज्यात ७८ लाख ७६ हजार मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या तब्बल ३ लाख ४१ हजारांनी जास्त आहे. त्यामुळे ज्येष्ठ महिलाच आमदार ठरविण्यात आघाडीवर राहणार हे उघड आहे.
राज्यातील मतदार
- एकूण ९,६३,६९,४१०
- पुरुष ४,९७,४०,३०२
- महिला ४,६६,२३,७७
- तृतीयपंथी ६,०३१
या वयोगटात महिला मतदार पुरुषांच्या पुढे
वयोगट पुरुष महिला तृतीयपंथी एकूण फरक
७०-७९ २६,३२,६९१ २७,१२,४२७ ६२ ५३,४५,१८० ७९,७३६
८०-८९ ९,१५,८९२ ११,१८,५०६ १३ २०,३४,४११ २,०२,६१४
९०-९९ १,९७,७६२ २,५१,२२१ ० ४,४८,९८३ ५३,४५९
१००-१०९ २१,१४१ २६,३५८ २ ४७,५०१ ५,२१७
११०-११९ ५१ ५९ ० ११० ८
१२० ५४ ५४ ० १०८ ०
एकूण ३७,६७,५९१ ४१,०८,६२५ ७७ ७८,७६,२९३ ३,४१,०३४
महिलांचे प्रमाण अधिक असलेल्या या आकडेवारीला एका सर्वेक्षणाचा देखील आधार आहे. सेंटर फॉर इकॉनॉमिक डेटा अँड ॲनालिसिसच्या सर्वेक्षणानुसार २०१४ ते १८ या दरम्यान देशातील महिलांचे सरासरी आयुर्मान पुरुषांपेक्षा चार टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून आले आहे. उदाहरणार्थ एखादा पुरुष ६८ वर्षे २ महिने जगत असल्यास महिला ७० वर्षे ७ महिने जगत असल्याचे दिसून आले आहे.
काेणत्या वयाेगटात जास्त?
- राज्याच्या मतदारांच्या आकडेवारीनुसार ७० ते ७९ या वयोगटात पुरुषांपेक्षा ७९ हजार ७३६ महिला मतदार जास्त आहे. तर ८० ते ८९ या वयोगटात महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा तब्बल २ लाख २ हजार ६१४ इतके जास्त आहे.
- ८९ ते ९९ या वयोगटातही ५३ हजार ४५९ महिला पुरुषांपेक्षा जास्त असून
शंभरी पार केलेल्या ज्येष्ठांमध्येदेखील महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा ५ हजार २१७
ने जास्त आहे.
- ११० ते ११९ या वयोगटातही ८ महिला पुरुषांपेक्षा जास्त आहे. १२० पेक्षा अधिक वयोगटात मात्र, पुरुष व महिलांचे प्रमाण सारखेच असल्याचे दिसून आले आहे.