उत्तर मुंबईत राबवणार जलशक्ती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 19:32 IST2021-06-14T19:31:08+5:302021-06-14T19:32:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "जलशक्ती अभियान" अर्थात (कॅच दी रेन) देशाला दिले असून, उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला.

उत्तर मुंबईत राबवणार जलशक्ती अभियान
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जलशक्ती अभियान राबवण्यात येणार आहे. मूलभूत जलस्त्रोत असलेले पावसाचे पाणी वाहून वाया जात असते. त्यामुळे या जलशक्ति अभियाना अंतर्गत गृहनिर्माण सोसायटीत पाझर खड्डे बनवून पावसाचे पाणी साठवता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "जलशक्ती अभियान" अर्थात (कॅच दी रेन) देशाला दिले असून उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते बोरीवली पश्चिम, महावीर नगर, हॅप्पी होम द्वारकेश सोसायटीत या अभियानाचा काल शुभारंभ झाला. सदर अभियानाद्वारे उत्तर मुंबईत पाण्याचा तुटवडा भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी, भाजप मुंबई सचिव विनोद शेलार, उत्तर मुंबई भाजप सरचिटणीस दिलीप पंडित उपस्थित होते
पावसाळी पाण्याचा साठा करण्यासाठी येथे पाझरची सुविधा उपलब्ध केल्या बद्धल हॅप्पी होम द्वारकेश सोसायटीच्या नागरिकांचे खासदार शेट्टी यांनी अभिनंदन केले. सदर अभियानामुळे जमिनीची धूप कमी होईल आणि भूजल पातळी वाढेल. तसेच विशेष करून उन्हाळ्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक सोसायट्यांनी हे अभियान सातत्याने राबविले पाहिजे. तसेच सदर योजना राबविण्याचे गृहनिर्माण सोसायट्यांना बंधनकारक केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आर्थिदृष्ट्या हा उपक्रम खूप कमी खर्चात शक्य असून फक्त २५० लीटर पाण्याच्या पिंपात पाच ते सहा फूटाचे पाझर खड्डे बनवून सदर प्रकल्प गृहनिर्माण सोसायट्या राबवू शकतात. सदर जलशक्ती अभियान नि:शुल्क केले पाहिजे. या योजनेद्वारे मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांना पावसाळ्यात निसर्गाकडून मिळालेल्या पाण्याचा साठा जमा करता येईल आणि सदर पाण्याचा उपयोग बोअरवेल व वृक्षासाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.