गणेश विसर्जनाची लातूर मनपाकडून जोरदार तयारी, शहरात १३ ठिकाणी संकलन केंद्र
By हणमंत गायकवाड | Updated: September 8, 2022 17:58 IST2022-09-08T17:57:05+5:302022-09-08T17:58:21+5:30
लातूर शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्तीचे दान करावे, असे आवाहन मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी केले आहे.

गणेश विसर्जनाची लातूर मनपाकडून जोरदार तयारी, शहरात १३ ठिकाणी संकलन केंद्र
लातूर : पाणीटंचाईनंतर लातूर शहरामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याऐवजी मूर्ती संकलन करून मनपाच्या वतीने एकत्रित विसर्जन केले जात आहे. त्यानुसार यंदा लातूर शहरात १३ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रांवर मूर्ती संकलित करून १२ नंबर पाटी येथील खदाणीत शुक्रवारी विसर्जन केले जाणार आहेत. त्यासाठी मनपाने सर्व उपाययोजना केल्या आहेत.
लातूर शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्तीचे दान करावे, असे आवाहन मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी केले आहे. दरवर्षी श्री गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील तीर्थकुंड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विहीर तसेच बांधकाम भवन परिसरातील विहीर येथे विसर्जन केले जात असे. या ठिकाणापर्यंत काही मिरवणुका जातील. तेथे आरती होईल. कृत्रिम तलावाची निर्मिती करून छोट्या मूर्तींचे विसर्जन केले जाईल. मोठ्या मूर्तींचे मात्र संकलन केले जाणार आहे.
या ठिकाणी आहेत संकलन केंद्र
लातूर महानगरपालिकेने १३ ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र स्थापन केले आहेत. पाण्याची टाकी, विवेकानंद चौक, यशवंत शाळा नांदेड रोड, मनपा शाळा क्र. ९ (मंठाळे नगर), श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, शासकीय विहीर (जिल्हाधिकारी कार्यालय परिसर), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (पाण्याची टाकी बार्शी रोड), दयानंद कॉलेज पार्किंग परिसर, सरस्वती कॉलेज (बार्शी रोड लातूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, बांधकाम भवन, खंदाडे नगर (कव्हा रोड), यशवंत शाळा (साळे गल्ली) तसेच तिवारी यांची विहीर या १३ ठिकाणी विसर्जनासाठी मूर्ती संकलन केंद्र निर्माण करण्यात आले आहेत.
पोलीस बंदोबस्तात विसर्जन
शुक्रवारी ‘श्रीं’चे विसर्जन होत असून, पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. विसर्जन मिरवणुकादरम्यान बंदोबस्त राहणार आहे. पोलिसांच्या वतीने व्हिडिओ चित्रिकरण होणार असून, शहरात ठिकठिकाणी कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली आहे. उत्साही वातावरणात ‘श्रीं’चे विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांनी सहकार्य करावे. शांततेत विसर्जन करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.