Kolhapur: चंदगड-गडहिंग्लज आजरा तालुक्यावर ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादल्यास रस्त्यावर उतरून लढाई, एकजुटीने विरोधाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:43 IST2025-07-08T18:43:20+5:302025-07-08T18:43:52+5:30

गडहिंग्लज येथे सर्वपक्षीय बैठक

Shaktipeeth highway should not be built in Chandgad Gadhinglaj Ajra taluka Role of key activists of all parties | Kolhapur: चंदगड-गडहिंग्लज आजरा तालुक्यावर ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादल्यास रस्त्यावर उतरून लढाई, एकजुटीने विरोधाचा निर्धार

Kolhapur: चंदगड-गडहिंग्लज आजरा तालुक्यावर ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादल्यास रस्त्यावर उतरून लढाई, एकजुटीने विरोधाचा निर्धार

गडहिंग्लज : हजारो अल्पभूधारकांना उद्ध्वस्त, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास व पर्यावरणाची अपरिमित हानी करणारा शक्तिपीठ महामार्गचंदगड-गडहिंग्लज-आजरा’ तालुक्यात नकोच अशी भूमिका सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांनी येथील बैठकीत घेतली. लोकभावना विचारात न घेता ‘शक्तिपीठ’ लादण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला एकजुटीने विरोध करण्याचा निर्धारही केला.

आठवड्यापूर्वी आमदार शिवाजी पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गातचंदगड विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्याची मागणी राज्याच्या रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे. त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्याला पुष्टी दिली. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.

मुश्रीफांची भूमिका दुटप्पी

कागलकरांना नको झालेला शक्तिपीठ चंदगडला द्या म्हणणे हा दुटप्पीपणा आहे. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने भूमिका मांडावी. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘शक्तिपीठ’ रद्दचा जीआर आणून मंत्री मुश्रीफ यांनी मतदारांची फसवणूक केली आहे, असा आरोप माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी केला.

म्हणूनच राजेश पाटील यांना पाठिंबा

चुकीच्या माणसाच्या हातात आमदारकी गेली तर त्याची किंमत मोजावी लागेल म्हणूनच मी विधानसभेला राजेश पाटील यांना पाठिंबा दिला होता, तरीही घोळ झाला आहे. आता सगळे मिळून निस्तरूया, अशी टिप्पणी संग्राम कुपेकर यांनी केली.

कोण काय म्हणाले?

 निसर्गसंपन्न घटप्रभा खोऱ्यातील इंचभर जमीनही शक्तिपीठाला देणार नाही. आपली संस्कृती व भावी पिढ्यांच्या भल्यासाठी शक्तिपीठ रोखायलाच हवा. - कॉ. संपत देसाई (कार्याध्यक्ष, श्रमिकमुक्ती दल

चंदगडच्या कसदार शेतीची बरबादी नको. ताकदीने लढा, आम्हीदेखील सोबत आहोत. - प्रकाश पाटील (समन्वयक, शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती, कोल्हापूर) 

‘चंदगड’मध्ये शक्तिपीठाची मागणी अव्यवहार्य, नैसर्गिक संकटांना निमंत्रण देणारी आहे. त्याला मान्यता दिली तर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. - जयसिंग चव्हाण (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

केवळ नेत्यांच्या-सरकारच्या समर्थनासाठी केलेली मागणी चुकीची आहे. आहेत त्या रस्त्यांसाठी पैसे आणून ते मजबूत करावेत, त्यांचे रुंदीकरण करावे. - विद्याधर गुरबे (जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस

चंदगडकरांना जैवविविधता जपणारा शाश्वत विकास हवा आहे. सवंग लोकप्रियतेसाठी शासनाच्या मदतीशिवाय जगणाऱ्या जनतेला उद्ध्वस्त करू नये. - नितीन पाटील (प्रदेशाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना)

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ गडहिंग्लज विभागातून जाऊ देणार नाही. - बाळेश नाईक (तालुकाध्यक्ष, जनता दल)

कोल्हापूर-गोव्यातील तीर्थक्षेत्रांना दीड-दोन तासात पोहोचता येते. त्यासाठी शक्तिपीठाची गरज नाही. त्याऐवजी बेळगाव-वेंगुर्ला रस्ता रुंद व मजबूत करावा. - अभयकुमार देसाई (माजी अध्यक्ष, बाजार समिती गडहिंग्लज) 

माणसं मारून विकास नको. बापाच्या नावचा सातबारा जिवंत ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. निलजी, जरळी, ऐनापूर बंधाऱ्याला पर्यायी पूल बांधावेत. - अमर चव्हाण (सरचिटणीस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) 

चंदगडमध्ये मुळशी पॅटर्न आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शेती व भावी पिढी उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. - सुभाष देसाई (अध्यक्ष, दलित पँथर) 

सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ‘एव्हीएच’ हद्दपार केलेला ‘चंदगड’चा शेतकरी शक्तिपीठ स्वीकारणार नाही. - सुनील शिंत्रे (जिल्हाध्यक्ष, उद्धवसेना) 

हिडकल डॅमला विरोध करण्यासाठी नेसरीकर रस्त्यावर उतरले होते. त्याचप्रमाणे शक्तिपीठाचा घाटही उधळून लावतील. जिल्ह्याला नको असलेला शक्तिपीठ आम्ही का स्वीकारायचा? - संग्रामसिंह कुपेकर (प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप)

धरणांमुळे विस्थापित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आणू नये. - स्वाती कोरी (माजी नगराध्यक्षा) 

Web Title: Shaktipeeth highway should not be built in Chandgad Gadhinglaj Ajra taluka Role of key activists of all parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.