थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
By समीर देशपांडे | Updated: December 28, 2025 13:02 IST2025-12-28T12:53:48+5:302025-12-28T13:02:12+5:30
Kolhapur Elections: विधानसभे पाठोपाठ महापालिकेतही कृष्णराज महाडिक बॅकफूटवर

थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
Krishnaraj Mahadik: कोल्हापूर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज यांनी थाटामाटात शनिवारी नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु रविवारी सकाळी त्यांनी मी निवडणूक लढवणार नसल्याचे समाजमाध्यमावर जाहीर केले आहे. त्यामुळे खासदार आणि आमदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय प्रदेश पातळीवरून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीतही कृष्णराज महाडिक हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. तसे फलकही लागले होते. परंतु ते रिंगणात उतरले नाहीत. मात्र त्यांनी चार दिवसांपूर्वी नगरसेवकपदासाठीचा उमेदवारी अर्ज नेल्याने चर्चेला उधाण आले. अशातच अजूनही महायुतीचा निर्णय झालेला नसताना आणि भाजपचे तिकीट वाटप झालेले नसताना कृष्णराज यांनी त्यांचा अर्जही दाखल केला. याबाबत पक्षीय पातळीवरून नापसंती व्यक्त करण्यात आल्याचे समजले. त्यामुळे रविवारी सकाळी तातडीने आपण निवडणूक लढवणार नसल्याचे आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याचे महाडिक यांना जाहीर करावे लागले.