कोल्हापुरातील मंडळांनी राखली विधायक गणेशाची परंपरा, डीजे फोडणाऱ्या गणपतीने वेधले लक्ष
By संदीप आडनाईक | Updated: September 4, 2025 18:36 IST2025-09-04T18:35:07+5:302025-09-04T18:36:33+5:30
देखाव्यातून जनजागृतीवर दिला भर

कोल्हापुरातील मंडळांनी राखली विधायक गणेशाची परंपरा, डीजे फोडणाऱ्या गणपतीने वेधले लक्ष
संदीप आडनाईक
कोल्हापूर : भपकेबाजपणे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना करू दे; पण आपण विधायक आणि पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची परंपरा जपूया या निर्धारातून कोल्हापुरातील काही मंडळांनी यंदाही सामाजिक भान जपत विधायक गणेशाची परंपरा राखली आहे.
यंदा ‘साऊंड सिस्टिम’ आणि ‘लेझर लाइट’ला नकार देत ‘खंडोबा’सारख्या काही मंडळांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे, तर काही मंडळांनी सामाजिक भान दाखवत विधायक संकल्पनेवर आधारित देखाव्यातून जनजागरण करण्यावर भर दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सोल्जर्स तरुण मंडळाने ‘दहशतवाद संपवा’, हाय कमांडो फ्रेंड सर्कलने ‘नको तिथे जाहिराती’, अवधूत गल्ली मित्रमंडळाने ‘डीजे फोडणारा गणपती’, सनी स्पोर्ट्सने ‘वाचाल तर वाचाल’ अशा देखाव्यांतून विधायक गणेशोत्सवाची परंपरा जपलेली आहे.
डीजे फोडणाऱ्या गणपतीने वेधले लक्ष
शुक्रवार पेठेतील रामानंद महाराज अवधूत मंदिर भक्त मंडळ ट्रस्टने देखाव्यातून ‘डीजेमुक्त शिवजयंती उत्सव’ ही अनोखी संकल्पना साकारली आहे. येथे डीजे फोडणाऱ्या गणेशमूर्तीने लक्ष वेधून घेतले आहे. या मंडळाची स्थापना १९३३ मध्ये झाली आहे. डीजेच्या भिंतींमुळे शिवमूर्ती दिसेना, मराठी माणसा तुला लाज कशी वाटेना, डीजे थांबवा, समाजाला जागवा या फलकाद्वारे या मंडळाने ध्वनिप्रदूषणमुक्त समाजनिर्मिती असा देखावा उभारला आहे. याशिवाय शहरातील विश्वजीत कदम यांनी ‘मराठी अभिजात भाषा’, विनायक गणबावले यांनी ‘शोले ५०’ तसेच वडणगे येथील गणेश कापसे यांनी ‘फळविक्रेता गणपती’चे विधायक दर्शन घडवणारे घरगुती देखावे सादर केले आहेत.
विधायक आणि सुसंस्कृत गणेशोत्सवासाठी हा सलग १७ व्या वर्षातील प्रयत्न आहे. यावर्षी ३ घरगुती आणि ४ सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती संकल्पना, देखावा, मांडणी यामध्ये माझी क्रियाशील आणि वैचारिक भूमिका आहे. विधायक परिवर्तन शक्य आहे, सातत्याने प्रयत्न करत राहू. - उमेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते.