उल्हासनगर प्रारूप मतदार यादीत घोळ, चक्क अंबरनाथ नागरिकांचे नावे
By सदानंद नाईक | Updated: November 26, 2025 19:52 IST2025-11-26T19:51:39+5:302025-11-26T19:52:07+5:30
आयुक्ताना निवेदन देत, हरकतीची मुदत वाढून देण्याची मागणी

उल्हासनगर प्रारूप मतदार यादीत घोळ, चक्क अंबरनाथ नागरिकांचे नावे
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड घोळ होऊन, चक्क अंबरनाथ पालेगाव नागरिकांचे नावे मतदार यादीत प्रसिद्ध झाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांना बुधवारी निवेदन देत हरकतीला मुदत वाढून देण्याची मागणी केली.
उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ व त्रुटी आढळल्या आहेत. यादीत चक्क अंबरनाथ पालेगाव नागरिकांची नावे समाविष्ट झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या यादीला समाजसेवक प्रशांत चंदनशिव यांनी याला हरकत घेतली. तर प्रत्येक प्रभागातील २ हजारा पेक्षा जास्त नावे एकमेकांच्या प्रभागात गेल्याने खळबळ उडाली. या प्रारूप मतदार यादीतील त्रुटी आणि गोंधळाबाबत हरकतीची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने, आयुक्त मनिषा आव्हाळे यांची भेट घेऊन हरकतीला मुदतवाढ देण्याची व उपाययोजना करण्याची मागणी केली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयुक्तांसमोर या प्रारूप मतदार यादीतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत प्रभाग बदलाचा घोळ, अनेक प्रभागांतील हजारो मतदारांची नावे चुकीने इतर प्रभागात समाविष्ट झाली. प्रशासनाने अशा सर्व चुका स्वतःहून शोधून दुरुस्त कराव्यात. तसेच, संबंधित प्रभागासाठीएकत्रित हरकती स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. दुबारा नावे, बोगस नावे, अपूर्ण व चुकीचे नावे व पत्ता, डिजिटल वाचनीय मतदार याद्या, फोटोसह मतदारांचे नावे, नागरिकांना आपले नाव शोधता यावे यासाठी मोबाईल फ्रेंडली लिंक, हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळा मध्ये उद्धवसेनेचे धनंजय बोडारे, राजेंद्र शाहू, काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे, किशोर धडके, मनसेचे सचिन कदम, जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, प्रजा पार्टीचे प्रमुख प्रकाश कुकरेजा यांच्यासह दिलीप मिश्रा, संजय घुगे, पवन मिरणी, अशेराम टाक यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची घोषणाबाजी
महापालिका आयुक्ता सोबतची बैठक संपल्यानंतर सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत निवडणूक आयोग व प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाने प्रारूप मतदार यादीतील चुकांची दखल घेऊन लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला.