Counting lasted more than twelve hours | बारा तासांपेक्षा अधिक वेळ चालली मतमोजणी

बारा तासांपेक्षा अधिक वेळ चालली मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निकाल ५ वाजेच्या आत जाहीर झाले. परंतु, निवडणूक विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जालना विधानसभेचा निकाल रात्री १० वाजता जाहीर करण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यांसह उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.
गुरुवारी विधानसभेचे निकाल जाहीर झाले. या निकालात दिग्जांना धक्के बसले. त्यापैकी एक असलेले शिवसेनेचे उमेदवार माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी २५ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.
जालना विधानसभेचा निकाल देण्यासाठी निवडणूक विभागाने जवळपास १२ तासांचा कालावधी लावला.
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासून मतमोजणी संथगतीने सुरु असल्यामुळे तीन फेऱ्यांना १० ते ११ वाजले. त्यानंतर ११ ते २ वाजेपर्यंत ८ फेरीचे निकाल आले. परंतु, त्यानंतर निकाल उशिरा आल्यामुळे रात्री १० ते ११ वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरु होती. रात्री दहा वाजता प्रशासनाने तेविसावी फेरी जाहीर केली. निकाल उशिरा येत असल्याने याचा त्रास माध्यम प्रतिनिधींनाही झाला. अनेक वेळा प्रशासनाला सांगूनही प्रशासनाने निकाल दिला नाही. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
जालना - औरंगाबाद रस्त्यावर वाहतूक ठप्प
जालना : मतमोजणी प्रक्रियेमुळे आयटीआय कॉलेजसमोर एकतर्फी वाहतूक करण्यात आली. त्यामुळे सर्व वाहनांना एकाच बाजूने ये-जा करावे लागत होते. परिणामी, येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.
गुरुवारी जालना विधानसभा निवडणुकीची मतमोजणी जालना शहरातील औरंगाबाद - जालना रोडवरील आयटीआय कॉलेज येथे पार पडली. मतमोजणी केंद्र परिसरात काही गोंधळ होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले होते. मतमोजणी दरम्यान जालना - औरंगाबाद रोडवर एका बाजूनेच वाहतूक सुरु होती. या मार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. एका बाजूने वाहतूक सुरु असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.
दिवसभर चाललेल्या मतमोजणीमुळे या मार्गावर अनेकवेळा वाहतूक ठप्प झाली होती. परंतु, वाहतूक पोलिसांनी तात्काळ वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल भाले यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Counting lasted more than twelve hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.