Maharashtra Election 2019: BJP's rebellion upsets everyone in Vasmat | Maharashtra Election 2019 : भाजप बंडखोरामुळे सर्वांचीच दमछाक

Maharashtra Election 2019 : भाजप बंडखोरामुळे सर्वांचीच दमछाक

- दयाशील इंगोले

वसमत विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार अ‍ॅड.शिवाजीराव जाधव यांच्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना व वंचित बहुजन आघाडी या सर्वांच्याच मतांवर ते डल्ला मारत असल्याने इतरांना विजयाचे गणित लावणेच अवघड बनले आहे.

लोकसभेसाठी वसमत विधानसभेतील भाजपचे अ‍ॅड.शिवाजी जाधव व सेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा हे दोघेही इच्छुक होते. मुंदडा यांचे तिकीट कापून हेमंत पाटील लढले. पाटील यांनी जाधव यांची मनधरणी करून माघार घ्यायला लावली. त्यानंतर जाधव यांनी साथ दिली. मात्र मुंदडा यांच्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे अनेक शिवसैनिकांनी प्रत्येकच लोकसभेला सेनाविरोधी काम करायचे असेल तर विधानसभेत आम्ही कशाला झटायचे, असा सवाल करीत अपक्ष जाधव यांच्यामागे शक्ती उभी केली.  मात्र मुंदडा हे एकटे फिरून जादू दाखवितात, यावरच उरलेल्या शिवसैनिकांना विश्वास वाटत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे राजू नवघरे हे नवखे असले तरी युवकांत क्रेझ असलेले उमेदवार आहेत. मात्र राष्ट्रवादीतील एक मोठा गट त्यांच्यापासून दुरावला. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे मुनीर पटेल हे प्रभावी असल्याने त्याचाही फटका सोसावा लागत आहे.

भाजपचे बंडखोर असलेले अपक्ष अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना इतरांकडून होणाऱ्या मदतीसोबतच भाजपचेही बळ मिळत आहे. यामुळे लोकसभेत महायुतीला मिळालेल्या मतांवरून या मतदारसंघाचे गणित लावणे चुकीचे ठरणार आहे. येथे महायुती १,00,८६९, आघाडी- ५२६४६ तर वंचितला ३३,३४८ मते होती. तर जाधव यांनी सर्वांचेच गणित बिघडविल्याने या मतदारसंघातील ही विचित्र परिस्थिती निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल, असे दिसत आहे. 

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
- या मतदारसंघात वसमत तालुक्यातील बहुतांश भाग हा तीन वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे सिंचनाखाली येतो. मात्र दुष्काळ व हे प्रकल्प भरत नसल्याने मागील तीन वर्षांपासून गोची होत आहे. त्यामुळे सिंचन वाढीचे उपाय करावे लागणार आहेत. अर्ध्या भागात तर नव्याने सोयी निर्माण कराव्या लागतील.
- मोठी व चांगली बाजारपेठ असूनही आवश्यक सुविधांचा अभाव आहे. उद्योगवाढीसाठी वाव असतानाही त्यादृष्टीने फारसे प्रयत्न होत नाहीत. बेरोजगारीचे प्रमाणही बरेच असून स्थानिकला रोजगार मिळणे गरजेचे आहे.
- या मतदारसंघात कृषीपूरक उद्योगांना वाव आहे. मात्र काही ठरावीक सोडले तर त्याला व्यापक रुप देता आले नाही. हळद उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. त्या दिशेने काही करण्याची गरज आहे. अंतर्गत रस्त्यांचा प्रश्नही गंभीर आहे. शहरी भागाच्या विकासातची अपेक्षित कामगिरी झाली नसल्याने बकालावस्था दिसत आहे.

प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजू

जयप्रकाश मुंदडा (शिवसेना)
चारवेळा आमदार, एकदा मंत्री राहिल्याने तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे आहे.
मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव असून त्यावर सातत्याने बोलत असतात.
कायम ‘एकला चलो रे’ची भूमिका वापरूनच यश मिळवत आले आहेत.

राजू नवघरे (राष्ट्रवादी)
युवकांमध्ये क्रेझ असलेला नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
विविध सामाजिक उपक्रम राबवून सामान्यांमध्ये ओळख निर्माण केली.
सहकारात काम करण्याचा तरुण वयातच अनुभव असल्याचा फायदा.

मुनीर पटेल (वंचित)
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिल्याने कायम जनसंपर्क राहिला.
दमदार चेहरा म्हणून वंचितची मूळ मते आकर्षित करण्यात यश येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते.

शिवाजी जाधव (अपक्ष)
मागील निवडणुकीतील पराभवानंतरही शेतकऱ्यांना कायम साथ.
टोकाई कारखाना, दूध डेअरीच्या माध्यमातून रोजगाराची संधी
मागील निवडणुकीत पराभवानंतरही कार्यरत असल्याने सामान्यांत सहानुभूती.

2०14चे चित्र
- जयप्रकाश मुंदडा (सेना-विजयी)  
- जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी-पराभूत)

 

Web Title: Maharashtra Election 2019: BJP's rebellion upsets everyone in Vasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.