Crowds for Shri Vighnaharta Chintamani Ganapati's Darshan | श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी
श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोली शहरातील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ओळख सर्वदूर आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो भाविक नवसाचा मोदक व दर्शन घेण्यासाठी येतात. यंदा अनंत चतुर्दशीच्या दोन दिवसांपूर्वीच भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
मंगळवारी दिवसभर जवळपास चाळीस ते पन्नास हजार भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी ९ वाजता इंदिरा चौकापासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दर्शन रांगेत भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने जागोजागी पाणी, चहा व फराळाची व्यवस्था केली होती. तसेच भाविकांचे ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी दर्शन रांगेवर ताडपत्रीची व्यवस्था केली होती. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी आपल्या घरासमोर प्रतिष्ठानासमोर भाविकांना चहा, पाणी व फराळाची व्यवस्था केली होती. त्यामुळे येणाºया भाविकांचे सुलभ दर्शन झाले. तसेच बाहेरुन येणाºया वाहनांची पार्किंगची व्यवस्था रामलीला मैदानावर करण्यात आली होती. रहदारीस अडथळा निर्माण होवू नये, यासाठी जागोजागी वाहतूक पोलीस तैनात केले होते. इंदिरा चौक ते गांधी चौकादरम्यान एका बाजूचा रस्ता वाहनांसाठी बंद केला होता. दर्शन रांगेला अडथळा निर्माण होणार नाही याची संपूर्ण खबरदारी पोलीस प्रशासनासह मंदिर समितीने घेतली होती. मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी ९ पोलीस अधिकारी व दीडशे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या वर्षी एकच मंडप उभारण्यात आला होता. यंदा तीन मंडप उभारण्यात आले आहेत. मंदिर परिसरात चोवीस तास कडक सुरक्षा ठेवली जात आहे. असे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सांगितले.
यंदा भाविकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ८ वाजेनंतर २ लाख ७१ हजार नवसाचे मोदक वाटपास सुरुवात होणार आहे. मोदक बनविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. गतवर्षी २ लाख ५१ हजार मोदकांचे वाटप केले होते. भाविकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे यंदा २५ हजारांनी मोदक वाढविण्यात असून अनंत चतुर्दशीनंतर पुढील चार दिवस मोदक वाटप केले जाणार असल्याचे मंदिर समितीने सांगितले.


Web Title:  Crowds for Shri Vighnaharta Chintamani Ganapati's Darshan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.