आमचा अर्थसंकल्प माटोळीसारखा; मुख्यमंत्री सावंत यांचे विजय सरदेसाईंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 08:49 IST2025-07-24T08:47:54+5:302025-07-24T08:49:20+5:30
कर्मचारी निवड आयोगातर्फे भविष्यात २५०० नोकऱ्या

आमचा अर्थसंकल्प माटोळीसारखा; मुख्यमंत्री सावंत यांचे विजय सरदेसाईंना प्रत्युत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्याचा अर्थसंकल्प हा 'चिप्स'च्या पाकिटाप्रमाणे नसून गणेश चतुर्थीच्या 'माटोळी' प्रमाणे आहे. ज्याप्रमाणे माटोळीमध्ये फळे, फुले, पाने असतात व त्याचा वापर होतो. तसाच हा अर्थसंकल्पही सर्वसमावेशक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.
गोवा राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक केली आहे. यामुळे उमेदवारांनाही नोकरभरतीसाठी घेतलेल्या परीक्षेत आपल्याला किती गुण मिळाले हे कळतात. आयोगाकडून भविष्यात अडीच हजार पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की अर्थसंकल्पावर टीका होत असली तरी तो सर्वसमावेशक आहे. सरकारला सोडचार हजार कोटींचे कर्ज घेण्याची मर्यादा आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ १ हजार ५० कोटींचे कर्ज सरकारने घेतले असून ते ५० वर्षांत फेडायचे आहे. सरकारची आर्थिक स्थिती चांगली असून महामंडळही कर्जमुक्त केली आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प हा चिप्सच्या पाकिटाप्रमाणे नसून गणेश चतुर्थीच्या माटोळीप्रमाणे आहे. तो प्रत्येक गोमंतकीयांचा आहे. त्यामुळे विरोधकांनी केवळ टीका करु नये, असे त्यांनी सांगितले.
सरकार पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देत आहे. सरकारच्या अॅप्रेंटीस उपक्रमा अंतर्गत २७ हजार उमेदवारांनी हा अॅप्रेंटीस कोर्स पूर्ण केला आहे. त्याचा त्यांना अनुभवाच्या दृष्टीने फायदा होईल. सरकारी खात्यांमधील कनिष्ठ लिपीक व एमटीएस पदांसाठी किमान एक वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र आवश्यक असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तेथे राखीवता कायम
मानवसंसाधन विकास महामंडळाच्या माध्यमातून आता खासगी क्षेत्रातही उमेदवारांची भरती करणे शक्य करण्यावर सरकारचा विचार सुरु आहे. याशिवाय महामंडळा अंतर्गत सेवा बजावणाऱ्यांना पोलिस खाते, वन खाते व अग्निशामक दलातील नोकऱ्यांमध्ये १० टक्के राखीवता असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.