Maharashtra Election 2019 ; Voting awareness is on | Maharashtra Election 2019 ; मतदान जनजागृती सुरूच

Maharashtra Election 2019 ; मतदान जनजागृती सुरूच

ठळक मुद्देप्लॅटिनम शाळेची रॅली : देसाईगंजात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान व्हावे, प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, या हेतूने निवडणूक आयोग व प्रशासनाच्या स्विप कार्यक्रमाअंतर्गत शाळा, महाविद्यालयांच्या वतीने गावागावात रॅली काढून मतदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
प्लॅटिनम ज्युबिली विद्यालय, गडचिरोली - स्थानिक प्लॅटिनम ज्युबिली विद्यालयाच्या वतीने शनिवारी गडचिरोली शहराच्या मुख्य मार्गावर रॅली काढून मतदान जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या हातात फलकामधील घोषवाक्य म्हणत नागरिकांना जागृत करण्याचे काम केले. सर्व मतदारांनी शिस्तबद्धतेने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रवृत्त केले. याप्रसंगी शालेय आवारात वोटर सेल्फीच्या सहाय्याने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे सांगितले. या रॅलीत संस्थेचे सचिव अजिज नाथानी, प्राचार्य प्रदीप मिस्त्री यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.
आदर्श महाविद्यालय, देसाईगंज - आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदान जनजागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर कुकरेजा यांच्या उपस्थितीत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावून इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे, लोकशाहीला बळकट करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी ही शपथ देण्यात आली. याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.निहार बोदेले, प्रा.नीलेश हलामी, प्रा. डॉ. जे. पी. देशमुख, प्रा. डॉ. डी. एन. कामडी, प्रा. एस. जी. गहाणे यांच्यासह रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजीवनी विद्यालयातर्फे जनजागृती - कॉम्प्लेक्स परिसरातील नवेगाव येथील संजीवनी विद्यालयाच्या वतीने शनिवारी कॉम्प्लेक्स व नवेगाव परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदारांनी २१ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क जबाबदारीने पार पाडावा, असे आवाहन करण्यात आले. फलक व बॅनरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे महत्त्व पटवून दिले. या रॅलीत मुख्याध्यापक एस.के.पोरेड्डीवार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एन.के.चुट्टे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.
निवडणूक विभाग, जिल्हा व तालुका प्रशासन तसेच शाळा, महाविद्यालयाच्या वतीने गावागावात व शहरात रॅली काढून मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जनजागृती सुरू आहे. शहराच्या मध्यभागी प्रशासनाच्या वतीने मोठमोठे बॅनर लावून मतदानाचा जागर केला जात आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Voting awareness is on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.