Maharashtra Election 2019 ; मतदान टक्केवारीने गाठली सत्तरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:25+5:30

संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या वेळी मुख्यालयी पोहोचतात. सोमवारी दुपारी ३ वाजता मतदान आटोपले असले तरी हे कर्मचारी बेस कॅम्प या सुरक्षित स्थळीच मुक्कामी होते. तेथून मतदार संघाच्या मुख्यालयी पोहोचण्यासाठी बहुतांश केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मंगळवारची सायंकाळ झाली.

Maharashtra Election 2019 ; Seventy percent of the vote was reached | Maharashtra Election 2019 ; मतदान टक्केवारीने गाठली सत्तरी

Maharashtra Election 2019 ; मतदान टक्केवारीने गाठली सत्तरी

Next
ठळक मुद्दे्गेल्या दोन निवडणुकींपेक्षा सरस : गडचिरोली, अहेरीत २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही मतदार संघाची विधानसभा निवडणूक यावेळी अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. अभूतपूर्व जनजागृतीसोबतच नक्षलवाद्यांचे हिंसक कारवाया करण्याचे मनसुबे हाणून पाडण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. परिणामी गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी पार करण्यात यावेळी यश आले.
मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार सर्वाधिक ७१.२ टक्के मतदान आरमोरी मतदार संघात झाले आहे. गडचिरोलीत ६८.४७ तर सर्वात जास्त नक्षलप्रभावित आणि दुर्गम भाग असलेल्या अहेरीत ७०.३४ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झालेली नव्हती. काही केंद्रांवरील आकड्यांची भर त्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तीनही मतदार संघातील ७ लाख ७५ हजार ३६९ मतदारांपैकी जवळपास साडेचार लाखावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे ९३२ मतदान केंद्रांपैकी ४५ टक्के मतदान केंद्र संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल होते. त्यापैकी एटापल्ली तालुक्यात काही मतदान केंद्र वेळेवर दुसरीकडे हलविण्यात आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र तरीही त्यांनी मोठ्या हिमतीने त्या केंद्रांवर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. नक्षलवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाला भीक न घालता मतदारांनी विविध अडचणींवर मात करत दाखविलेली हिंमत प्रशासकीय यंत्रणेच्या उत्साहात भर घालणारी ठरली. दुर्गम भागात युवा पिढीपेक्षाही प्रौढ मतदारांमध्ये जास्त उत्साह आणि आशा दिसून आली.

३१ तासानंतर नेमकी टक्केवारी नाहीच
संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या वेळी मुख्यालयी पोहोचतात. सोमवारी दुपारी ३ वाजता मतदान आटोपले असले तरी हे कर्मचारी बेस कॅम्प या सुरक्षित स्थळीच मुक्कामी होते. तेथून मतदार संघाच्या मुख्यालयी पोहोचण्यासाठी बहुतांश केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मंगळवारची सायंकाळ झाली. त्यानंतर बुथनिहाय सर्व आकडेवारी पडताळणी करण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे मतदानाची वेळ संपल्यापासून ३१ तासानंतरही म्हणजे मंगळवारच्या रात्री १० वाजतापर्यंत मतदानाच्या टक्केवारीचा अंतिम आकडा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला नव्हता.

नक्षलवाद्यांचे मनसुबे फेल
नक्षलवाद्यांकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही घातपाती कारवाया, गोळीबार, भूसुरूंग स्फोट घडवून आणले जाण्याची शक्यता पाहता पोलीस दलाने योग्य ती खबरदारी घेत सर्व तयारी केली होती. त्यामुळे नक्षलवादी कोणत्याही कारवाया घडवून आणण्यात यशस्वी झाले नाही. गेल्या अनेक निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत नक्षली कारवाया नियंत्रणात राहिल्या.

अभूतपूर्व जनजागृती
निवडणुकीचे कर्तव्य प्रत्येक मतदाराने पार पाडाने यासाठी जिल्हाभरात अभूतपूर्व अशी जनजागृती झाली. शाळा-महाविद्यालयांपासून तर सण-उत्सवापर्यंत सर्वच ठिकाणी मतदानाचे महत्व सांगण्यात आले. गावागावात रॅली काढून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून नक्षली दहशतीतही नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Seventy percent of the vote was reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.