‘खुल जा ईव्हीएम...’ आज मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:20 AM2019-10-24T00:20:58+5:302019-10-24T00:22:25+5:30

जिल्ह्यात ७ लाख ७५ हजार ३६९ मतदारांपैकी ५ लाख ४४ हजार ७७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या मतदानाची टक्केवारी ७०.२६ टक्के एवढी आहे. या मतदानामुळे आरमोरी मतदार संघातील १२, गडचिरोली मतदार संघातील १६ तर अहेरी मतदार संघातील ९ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले. गुरूवारी ईव्हीएममधील आकडे बाहेर येऊन मतदारांचा कौल कोणाला हे स्पष्ट होणार आहे.

Countdown to 'Open EVM ...' | ‘खुल जा ईव्हीएम...’ आज मतमोजणी

‘खुल जा ईव्हीएम...’ आज मतमोजणी

Next
ठळक मुद्दे३७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला : सकाळी ८ वाजतापासून गडचिरोली, देसाईगंज आणि अहेरीत मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली : विधानसभेच्या २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरूवार दि.२४ रोजी होऊन दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. तीनही मतदार संघाच्या मुख्यालयी स्ट्रॉँग रूममध्ये बंदिस्त असलेल्या ईव्हीएम सकाळी बाहेर काढून ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. आरमोरी व अहेरीत प्रत्येकी १४ तर गडचिरोलीमध्ये २० टेबलवर मतमोजणी चालणार आहे.
जिल्ह्यात ७ लाख ७५ हजार ३६९ मतदारांपैकी ५ लाख ४४ हजार ७७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या मतदानाची टक्केवारी ७०.२६ टक्के एवढी आहे. या मतदानामुळे आरमोरी मतदार संघातील १२, गडचिरोली मतदार संघातील १६ तर अहेरी मतदार संघातील ९ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले. गुरूवारी ईव्हीएममधील आकडे बाहेर येऊन मतदारांचा कौल कोणाला हे स्पष्ट होणार आहे.
मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. याकरीता २५० पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी दिली. मतमोजणीच्या कामावर निवडणूक निरिक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सुक्ष्म निरिक्षक लक्ष ठेवून राहणार आहेत. मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रथमच शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पडल्या. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक कर्मचारी व पोलीस दल सुखरूप परतले आहेत. अतिदुर्गम भागातील परिस्थिती, पाऊस, नदी-नाल्यातील पाणी या अडचणीवर मात करून मतदार, निवडणूक कर्मचारी व पोलीस यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. विधानसभा निवडणुका २०१४ आणि २००९ चा आकडा पार करून लोकसभेच्या जवळपास या निवडणुकीची सरासरी गेली. यावरु नच गडचिरोलीमधील मतदार लोकशाहीबाबत जागरूक असल्याचे समोर आले आहे.

पोस्टल बॅलेटने सुरूवात, व्हीव्हीपॅट पडताळणीने शेवट
सकाळी ८ वा सर्वप्रथम पोस्टल मतमोजणी होणार असून त्यानंतर मतदान केंद्रनिहाय ईव्हीएमची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर एका निश्चित केलेल्या टेबलवर रँडमली निवड केलेल्या पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांचीही मतमोजणी करून ईव्हीएम मधील आकडे आणि व्हीव्ही पॅटमधील पावत्या जुळतात किंवा नाही याची तपासणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक, सुक्ष्म निरीक्षक, शिपाई याप्रमाणे कर्मचारी असणार आहेत.

येथे होईल मतमोजणी
आरमोरी मतदार संघ- तहसील कार्यालय, देसाईगंज
गडचिरोली मतदार संघ- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर मार्ग, गडचिरोली
अहेरी मतदार संघ- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागेपल्ली

विधानसभानिहाय मतमोजणी फेऱ्या
आरमोरी विधानसभा मतदार संघात २१ फेऱ्या, गडचिरोलीत १८ फेºया तर अहेरीत २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल.

Web Title: Countdown to 'Open EVM ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.