Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्वीट प्रकरण : कंगना रणौतला अटकेपासून तुर्तास दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 06:23 IST

कंगनाविरोधात अजामीनपात्र  वॉरंट जारी करावे, अशी मागणी गीतकार जावेद अख्तर यांनी केली आहे.

मुंबई : दिल्लीत कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शीख समुदायाच्या शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह ट्वीट करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिला २५ जानेवारी २०२२ पर्यंत अटक करणार नाही, असे आश्वासन मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला सोमवारी दिले. दरम्यान, कंगनाविरोधात अजामीनपात्र  वॉरंट जारी करावे, अशी मागणी गीतकार जावेद अख्तर यांनी केली आहे.

कंगना रणौतच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्नही याद्वारे उपस्थित होत असल्याने न्यायालयाला तिला अंतरिम दिलासा द्यावा लागेल, असे मत न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. नोव्हेंबरमध्ये शीख संघटनांनी केलेल्या तक्रारीवरून खार पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी कंगनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, तक्रारदारांनी तिच्या २१ नोव्हेंबरच्या इन्स्टाग्राम पोस्टवर आक्षेप घेतला आहे. तिच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर केस बनत नाही.

कंगनाने या पोस्टद्वारे दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ‘खलिस्तानी चळवळ’ म्हणून उल्लेख केल्याने शीख संघटनेच्या काही सदस्यांनी तिच्याविरोधात पोलीस तक्रार केली. कलम २९५-ए अंतर्गत गुन्हा नोंदविताना आरोपीने एका विशिष्ट व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या दुखावण्याच्या हेतुपुरस्सर किंवा दुर्भावनापूर्ण हेतूने आक्षेपार्ह टिप्पणी करणे आवश्यक आहे; परंतु याप्रकरणी अभिनेत्रीचा असा कोणताही हेतू नव्हता, असा युक्तिवाद कंगनाच्या वकिलांनी केला.

टॅग्स :कंगना राणौतपोलिस