'पंचायत' वेबसीरिजने प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळवलं. या वेबसीरिजचे तीनही सीझन प्रचंड गाजले. जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, नीना गुप्ता, फैसल मलिक या कलाकारांच्या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिका होत्या. प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या 'पंचायत' वेबसीरिजला मोठा बहुमान प्राप्त झाला आहे. 'पंचायत' ही मुंबईत होणाऱ्या Waves Summit 2025 मध्ये सहभागी होणारी पहिली वेबसीरिज ठरली आहे. यानिमित्ताने 'पंचायत'चे कलाकार आणि मेकर्स उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
'पंचायत'ला Waves Summit 2025 मध्ये मिळाला मोठा बहुमान
मुंबईत सध्या १ मे ते ४ मे पर्यंत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये Waves Summit 2025 चं आयोजन करण्यात येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्धाटन करण्यात आलं. याच मानाच्या कार्यक्रमात 'पंचायत' वेबसीरिजला बहुमान प्राप्त झाला आहे. Waves Summit 2025 असा बहुमान मिळवणारी पंचायत ही पहिली वेबसीरिज ठरली आहे. यानिमित्ताने Waves Summit 2025 च्या तिसऱ्या दिवशी पंचायत वेबसीरिजचे कलाकार अर्थात जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, नीना गुप्ता, फैसल मलिक हे सहभागी होणार असून पंचायत सीरिजचे निर्मातेही दिसणार आहेत.
लवकरच रिलीज होणार पंचायत ४
काहीच दिवसांपूर्वी 'पंचायत' वेबसीरिजचे निर्माते अर्थात TVF ने या वेबसीरिजच्या चौथ्या सीझनची घोषणा केली. एक खास व्हिडीओ शेअर करुन 'पंचायत'च्या मेकर्सने ही घोषणा केली. 'पंचायत'चा चौथा सीझन अर्थात 'पंचायत ४' २ जुलै २०२५ रोजी रिलीज होणार आहे. 'पंचायत' वेबसीरिजचे याआधीचे तीनही सीझन चांगलेच गाजले. आता चौथ्या सीझनमध्ये काय कहाणी दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.