तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘डू यू वाना पार्टनर’ या वेब सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या १२ सप्टेंबरला कॉमेडी ड्रामा असलेली ‘डू यू वाना पार्टनर’ ही सीरिज प्रदर्शित केली जाणार आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली आहे.
धर्मॅटिक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या या सीरिजची निर्मिती करण जोहर, आदर पुनावाला आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. शोमेन मिश्रा आणि अर्चित कुमार एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर्स आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी कॉलिन डी'कुन्हा आणि अर्चित कुमार यांनी सांभाळली आहे. या सिरीजची कथा नंदिनी गुप्ता, अर्श वोरा आणि मिथुन गंगोपाध्याय यांनी लिहिली असून, गंगोपाध्याय आणि निशांत नायक यांची ही संकल्पना आहे. तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी यांच्यासोबत या सीरिजमध्ये जावेद जाफरी, नकुल मेहता, श्वेता तिवारी, नीरज काबी, सूफी मोतीवाला आणि रणविजय सिंह यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘डू यू वाना पार्टनर’ ही एक भन्नाट आणि आधुनिक काळातील कॉमेडी-ड्रामा आहे, ज्यामध्ये शिखा आणि अनाहिता (तमन्ना आणि डायना यांच्या भूमिका) या दोन जिवलग मैत्रिणींची गोष्ट सांगितली आहे. त्या दोघी महिलांसाठी अत्यंत अपरिचित असलेल्या क्राफ्ट बीयरच्या पुरुषप्रधान जगात स्वतःचं अल्कोहोल स्टार्टअप सुरू करण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलतात. शहरी जीवनाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, ही सिरीज मैत्री, स्वप्नपूर्ती, स्त्री सशक्तीकरण आणि सामाजिक रूढींच्या विरोधात उभं राहत आपली जागा निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास दाखवते. जुगाड, जज्बा आणि स्टाईलच्या जोरावर त्या आपली वेगळी वाट निर्माण करतात.
‘डू यू वाना पार्टनर’ ही सीरिज आधुनिक भारतातल्या स्त्रियांच्या उद्योजकीय प्रवासाला विनोदी आणि प्रेरणादायी रूपात मांडते. आणि १२ सप्टेंबरपासून ती जगभरातील प्रेक्षकांसाठी फक्त प्राइम व्हिडीओवर उपलब्ध होणार आहे.