अभिनेता एजाज खान सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकतेच अभिनेत्याचे नाव बलात्काराच्या प्रकरणात समोर आले आहे. एका ३० वर्षीय महिलेने एजाज खानविरोधात मुंबई पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. हे प्रकरण मुंबईच्या चारकोप पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर एजाज खान पोलिसांच्या रडारवरून गायब झालयाची माहिती समोर येत आहे. तक्रार दाखल होताच एजाज खान याचा फोन बंद झाला असून, अभिनेता फरार झाल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
मुंबईच्या चारकोप पोलिसांनी सांगितले की, "अभिनेत्रीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अभिनेता एजाज खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल फोन बंद येत आहे. एजाज खान फरार झाला आहे. पोलिस त्याला शोधण्यासाठी त्याच्या घरी देखील गेले, पण तो तिथेही उपस्थित नव्हता. अशा परिस्थितीत आता पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत." अभिनेता एजाज खान याने पीडित ३० वर्षीय अभिनेत्रीला प्रपोज केला होता आणि तिच्या घरी गेल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर, एजाज खानने महिलेला धर्म बदलून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते.
एजाज खानच्या अडचणी वाढणार!बलात्कारासोबतच एजाज खानवर समाजात अश्लीलता पसरवल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 'हाऊस अरेस्ट' या शो दरम्यान एजाजने स्पर्धकांना अश्लील कृत्ये करण्यास सांगितले होते, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर एजाज खान आणि उल्लू अॅपवर कारवाईची मागणीही केली जात आहे. या वादादरम्यान, उल्लू अॅपने 'हाऊस अरेस्ट' या शोचे सर्व भाग काढून टाकले आहेत. दुसरीकडे, गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाल्यामुळे अभिनेता एजाज खान याच्या अडचणी वाढल्या आहेत.