Join us

"मी जिवंत आहे समजताच लहान मुलांनी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याचा भारावणारा अनुभव

By देवेंद्र जाधव | Updated: February 26, 2025 15:19 IST

'छावा' सिनेमात कवी कलशजी साकारणाऱ्या अभिनेत्याचा अनुभव वाचून थक्क व्हाल. इतकं अमाप प्रेम त्यांना मिळालं आहे (chhaava, vineet kumar singh)

'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या चर्चा आहे. या सिनेमातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 'छावा'मध्ये गाजलेली अशीच एक भूमिका म्हणजे कवी कलश यांची. शेवटपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांची साथ न सोडणारे कवी कलश यांची भूमिका अभिनेता विनीत कुमार सिंगने (vineet kumar singh) साकारली आहे. 'छावा' सिनेमातील विनीतने कवी कलश यांची भूमिका अक्षरशः जीवंत केलीय. विनीत कुमार सिंगने कवी कलशच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय, त्याचाच भारावून टाकणारा अनुभव शेअर केलाय.

कवी कलश साकारताना...

विनीत कुमार सिंग एका मुलाखतीत म्हणाला की, "काहीतरी विशेष होतंय याची जाणीव मला झाली. जेव्हा मी सिनेमाची स्क्रीप्ट वाचत होतो तेव्हाच हा सिनेमा लोकांच्या हृदयाला स्पर्श करेल याची मला खात्री होती. सिनेमाचा क्लायमॅक्स शूटिंग करताना मी अत्यंत भावनिक झालो होतो. याशिवाय छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशजी यांच्या जीवलग मैत्रीचा माझ्यावर परिणाम झाला. आम्हाला माहित होतं की या सिनेमाला लोकांचं प्रेम मिळेल. पण इतकं अमाप प्रेम मिळेल याची आम्ही कल्पना केली नव्हती. आता जेव्हा मी थिएटरमध्ये जातो तेव्हा प्रेक्षकांनी मला त्यांच्या कुटुंबाचा भाग बनवलंय अशी भावना दाटून येते."

विनीत कुमार सिंग पुढे म्हणाला की, "लहान मुलं मला मिठी मारतात. त्यांच्या कुटुंबातील खास व्यक्ती असल्याप्रमाणे मला वागणूक देतात. जेव्हा ते मला प्रत्यक्षात जिवंत असल्याचं पाहतात तेव्हा भारावून जातात. एक आई तिच्या लहान बाळाचे लाड करते तसं एअरपोर्टवर लोक माझे गालगुच्चे घेतात. असा अनुभव मी याआधीच कधीच घेतला नाही." अशा शब्दात विनीत कुमार सिंगने त्याला आलेला अनुभव शेअर केलाय. 'छावा'मध्ये विनीत कुमार सिंगने साकारलेल्या कवी कलशजींच्या भूमिकेची खूप प्रशंसा होतेय.

टॅग्स :विनीत कुमार सिंह'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाअक्षय खन्ना