Join us

"तुझं नाव काय? आता लोक असं विचारणार नाहीत"; 'छावा' फेम कवी कलशचं भावुक ट्वीट

By ऋचा वझे | Updated: February 19, 2025 14:02 IST

विनीत कुमार सिंहची भूमिका पाहून प्रेक्षक भारावले आहेत. खऱ्या अर्थाने अभिनेत्याला आज ओळख मिळाली आहे.

'छावा' सिनेमाला सध्या थिएटरमध्ये प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. दिवस रात्र सिनेमाचे शो हाऊसफुल सुरु आहेत. विकी कौशलचं छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी खूप कौतुक होत आहे. शिवाय सिनेमातील इतरही कलाकारांच्या अभिनयाची दखल घेतली गेली आहे. त्यातच एक अभिनेता म्हणजे विनीत कुमार सिंग (Vineet Kumar Singh). त्याने सिनेमात कवी कलशची भूमिका अत्यंत उत्तमरित्या साकारली आहे. बऱ्याच वर्षांनी विनीतला त्याची खरी ओळख मिळाली आहे. त्याने ट्वीट करत आपल्या भावना मांडल्या आहेत.

अभिनेता विनीत कुमार सिंहने ट्वीट करत लिहिले,"सुरुवातीला सर्वांचे मनापासून धन्यवाद..मनाला भावणाऱ्या कथांचा भाग होणं ही एक कलाकार म्हणून खूप महत्वाची गोष्ट असते. सर्वांना प्रेरित करणाऱ्या आणि भावणाऱ्या सिनेमांमध्ये काम करणं हे माझं नेहमीच ध्येय होतं. मुक्काबाज नंतर एक काळ असा होता की माझ्याकडे कामच नव्हतं. पण आज, मला अभिमान वाटेल अशा सिनेमांचा मी भाग आहे. छावा हा त्यापैकीच एक आहे जो माझ्या मनाच्या आणि हृदयाच्या जवळचा आहे."

तो पुढे लिहितो,"मी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, कास्टिंग डायरेक्टर  आणि निर्माते दिनेश विजान यांचे कायम आभार मानेन. कवी कलश ही सुंदर आणि ताकदवान भूमिका निभावण्यासाठी त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आयुष्य या ना त्या मार्गाने तुम्हाला काहीतरी शिकवत असतंच. कधी ते कठीण असलं तरी अर्थपूर्ण असतं. मला नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या सर्व कलाकार, दिग्दर्शक आणि पत्रकारांचेही आभार. तुमच्यामुळेच मला आणखी चांगलं काम करण्याची, मेहनत घेण्याची प्रेरणा मिळाली. संघर्ष आणि चुकांमधूनही कधीही हार न मानण्याचं प्रोत्साहन मिळालं.  माझ्या वाईट काळात जे माझ्यासोबत उभे राहिले त्यांचे मनापासून आभार."

"प्रेक्षकांनो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुमचे मेसेज पाहून मी भारावलो आहे. सुरुवातीचं माझं काम पाहून लोक मला येऊन गोड प्रश्न विचारायचे की, 'सर, एक विचारु का? तुमचं नाव काय आहे?' छावानंतर आता ते हा प्रश्न विचारणार नाहीत अशी मला आशा आहे.  'छावा'चा प्रतिसाद आतून आनंद देणारा आहे त्यासाठी आभार."

टॅग्स :विनीत कुमार सिंहबॉलिवूड'छावा' चित्रपट