'12th फेल' सिनेमाच्या घवघवीत यशामुळे अभिनेता विक्रांत मेस्सीच्या (Vikrant Massey) चाहत्यावर्गात कमालीची वाढ झाली. सध्या विक्रांतकडे एकामोमाग एक प्रोजेक्ट्स आहेत. त्याचा 'आँखो की गुस्ताखियां' सिनेमा रिलीज होत आहे. यामध्ये तो 'स्टारकिड' शनाया कपूरसोबत (Shanaya Kapoor) दिसणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला. विक्रांत आणि शनायाने सिनेमात किसींग सीनही दिले आहेत. १३ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन दिल्यावरुन विक्रांतने आता प्रतिक्रिया दिली आहे.
फिल्मीग्यान ला दिलेल्या मुलाखतीत विक्रांत मेस्सी म्हणाला, " त्या सीनबाबतीत आम्ही आधी चर्चा केली. काम करता करता आमच्यात एकमेकांबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली होती. आम्ही बऱ्याच गोष्टींबाबतीत सारखेच आहोत. सेटवर आमची ओळख झाली आणि विशेषत: त्या सीनवेळी आम्ही कलाकार म्हणून नाही तर विक्रांत आणि शनाया म्हणून एकमेकांशी संवाद साधला. यामुळे आम्ही एकमेकांना समजून घेऊ शकलो आणि तो सीन करतानाही काही अडचण आली नाही."
तो पुढे म्हणाला, "जेव्हा विश्वास असतो तेव्हा दोन व्यक्ती एकमेकांजवळ येतात. आम्ही दोघंही भुकेले कलाकार आहोत. आम्हाला सर्वोत्कृष्टच काम करायचं आहे. यासाठीच एकमेकांवर विश्वास असणं गरजेचं आहे."
शनाया कपूर ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आणि अनिल कपूरची पुतणी आहे. अनन्या पांडे, सुहाना खानची ती बेस्ट फ्रेंड आहे. शनाया 'आँखो की गुस्ताखियां'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिच्या सौंदर्याची, अभिनयाची आतापासूनच स्तुती होत आहे. सिनेमा ११ जुलै रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होत आहे.